पिंपळे व राय यांचा पक्षप्रवेश कुंभारेंवर रद्द करण्याची नामुष्की; आ. देशमुखांची उघड नाराजी
By कमलेश वानखेडे | Updated: November 24, 2025 16:51 IST2025-11-24T16:49:24+5:302025-11-24T16:51:51+5:30
Nagpur : निवडणुकीच्या भरात सावनेरातील नरेंद्र पिंपळे व अमीत राय यांचे पक्ष प्रवेश रद्द

Disgrace to cancel party membership of Pimple and Rai on the Kumbhare; A. Deshmukh's open displeasure
नागपूर : सावनेर मतदारसंघातील पक्ष प्रवेशावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. नरेंद्र पिंपळे व रमेश राय यांचा घडवून आणलेला पक्ष प्रवेश जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या अंगलट आला आहे. या प्रवेशावर सोमवारी आ. आशीष देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त करताच जिल्हाध्यक्ष कुंभारे यांना दोन्ही प्रवेश रद्द करण्याची घोषणा करावी लागली. या प्रवेशाची कुठलिही कल्पना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. देशमुख यांना नव्हती, असेही कुंभारे यांनी स्पष्ट केले.
सावनेर येथे उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते. यावेळी आ. आशीष देशमुख यांनी सावनेर मतदारसंघात गेल्या आठवड्यात झालेल्या पक्ष प्रवेशावर उघड नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत देशपांडे, डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, दादाराव मंगळे, रामराम मोवाडे आदी उपस्थित होते. आ. देशमुख म्हणाले, रेती माफिया, सट्टा माफियांसोबत असलेल्यांविरोधात सावनेरच्या लोकांनी मला विधानसभेत कौल दिला. पण आपल्याच पक्षात असे रेती माफिया, सट्टा पट्टी चालविणारे लोक येणार असतील, महसूल बुडविणारे लोक, महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालविणारे लोक महसूल मंत्र्यांसोबत दिसतात तेव्हा आम्हाला वेदना होतात. असे हे अवैध धंदे करणारे, महसूल बुडविणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का, असे झालेले प्रवेश दोन दिवसात रद्द करण्याचे काम महसुल मंत्र्यांनी करावे. दोन दिवसात निर्णय न घेतल्यास बुधवारी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा आ. देशमुख यांनी दिला. विशेष म्हणजे रोखठोक मत मांडून आ. देशमुख कार्यालयातून निघून गेले.
प्रवेशाशी बावनकुळेंचा संबंध नव्हता
आ. देशमुख यांनी आक्रमक भूमिका मांडताच पक्षात खळबळ माजली. त्यांच्या भाषणानंतर १५ मिनीटातच जिल्हाध्यक्ष कुंभारे प्रसार माध्यमांसमोर आले. पिंपळे व राय यांचा पक्षप्रवेश जिल्हा भाजपने करून घेतला होता. या पक्ष प्रवेशाशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. आशीष देशमुख यांचा कुठलाही संबंध नव्हता. त्यांना कल्पना नव्हती, असे सांगत नरेंद्र पिंपळे व अमीत राय यांचे पक्षप्रवेश रद्द करीत भाजपमधून निष्काषित करण्यात आल्याची घोषणा कुंभारे यांनी केली. यानंतर तसे पत्रही संबंधितांना जिल्हाभाजपकडून जारी करण्यात आले.