काटोलात चरणसिंग ठाकुरांच्या उमेदवारीची चर्चा, आशीष देशमुख बंडाच्या पवित्र्यात
By कमलेश वानखेडे | Updated: October 22, 2024 17:40 IST2024-10-22T17:39:39+5:302024-10-22T17:40:22+5:30
मुंबई गाठत घेतली फडणवीस यांची भेट : २७ ला समर्थकांचा मेळावा, २८ ला अर्ज भरणार

Discussion of Charan Singh Thakur's candidacy in Katol, Ashish Deshmukh in the posture of rebellion
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :काटोल मतदारसंघाची भाजपची उमेदवारी चरणसिंग ठाकूर यांना जाहीर झाल्याचे वृत्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पसरताच माजी आ. आशीष देशमुख सक्रीय झाले. देशमुख यांनी मंगळवारी सकाळी तातडीने मुंबई गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर देशमुख यांनी २७ तारखेला मेळावा आयोजित करण्यात आल्याचे निमंत्रण समर्थकांना पाठविले. या मेळाव्यानंतर २८ ऑक्टोबरला ते अर्ज भरतील, असेही त्यांच्या समर्थकांकडून सांगतिले जात आहे.
२०१४ च्या निवडणुकीत काटोलमध्येआशीष देशमुख यांनी भाजपक़ून लढत राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. मात्र, आमदारकीची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच भाजप नेत्यांशी झालेल्या मतभेदातून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व पक्ष सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपविली. मात्र, ठाकूर यांचा अनिल देशमुख यांनी पराभव केला व ही जागा पुन्हा भाजपच्या हातून गेली.
यावेळी देशमुख व ठाकूर या दोन्ही नेत्यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला. सुरुवातीला दोन्ही नेते एकत्रित पक्षाच्या प्रचारासाठी फिरले. पण जसजशी निवडणूक जवळ आली तसतसे दोघांनीही आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले. भारसिंगी येथील मेळाव्यात तर दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे यावेळी आपल्याला लढू द्यावे, अशी विनंती एकमेकांना केली होती. त्यानंतर पारडशिंगा येथे बूथ कमिटीच्या बैठकीत दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले होते. दोघांच्या वादात भाजमध्ये प्रवेश घेतलेले जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी दोघांनीही वाद न करता आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन केले होते. या रस्सीखेचामुळे काटोलचा राजकीय पारा चांगलाच चढला आहे.
गडकरींच्या भेटीनंतर ठाकुरांची चर्चा
तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी ठाकूर यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांध्ये पसरली. ही चर्चा वाढत असल्याचे पाहून आशीष देशमुख सतर्क झाले व त्यांनी मुंबई गाठली. प्राप्त माहितीनुसार देशमुख माघार घेण्यास तयार नाहीत. ते २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.