सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:15 IST2024-12-16T15:13:12+5:302024-12-16T15:15:31+5:30

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं.

Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case | सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे. तसंच या हत्या प्रकरणातील इतर आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनजंय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जळवचे असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अशी मागणी होत होती. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. त्यानंतर सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.

अंबादास दानवे यांच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असतं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो. अशा मंत्र्यांवरही कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सरकारवर सरकारी पक्षातील, विरोधी पक्षातील कोणाचाही आरोपीला वाचवा, असा दबाब आलेला नाही. आम्ही यामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी टेक्निकल आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

दरम्यान, "आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा-धर्माचा आहे, कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे, अशा प्रकारचा विचार न करता घटनेत सहभागी असणार्‍या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. त्यासाठीच ही केस सीआयडीकडे दिली आहे. तसंच एक विशेष एसआयटी नेमली जाईल," अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा दाखल, पण अद्याप कारवाई नाही!

ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह  तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड (रा. परळी), विष्णू चाटे (रा. कौडगाव, ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी, ता. केज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुनिल केदू शिंदे (वय ४२, रा. नाशिक ह. मु. बीड) असे फिर्याद देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही.

Web Title: Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.