Zombivli Teaser Out Amey wagh Lalit Prabahkar And Vaidehi Parshurami Marathi Film Releasing on 30th April | 'झोंबिवलीचा ' टिझर लाँच ! पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर - कॉमेडी सिनेमा, अमेय, ललित आणि वैदेही लढणार झोंबीसोबत

'झोंबिवलीचा ' टिझर लाँच ! पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर - कॉमेडी सिनेमा, अमेय, ललित आणि वैदेही लढणार झोंबीसोबत


 फास्टर फेणे, क्लासमेट्स,  माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ' झोंबिवली ' हा  सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली  होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल. 

 

२०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने  आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे. 

 

मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात. 

ह्या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, " मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले,  तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे  चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल.आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत सिनेमाचे शूटिंग केले.

लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे."

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Zombivli Teaser Out Amey wagh Lalit Prabahkar And Vaidehi Parshurami Marathi Film Releasing on 30th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.