In the third week, the movie 'Firzand' has already begun | तिस-या आठवड्यातही 'फर्जंद' चित्रपटाची घौडदौड सुरुच

तिस-या आठवड्यातही 'फर्जंद' चित्रपटाची घौडदौड सुरुच

‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत पन्हाळ्यावर केलेल्या  अतुलनीय शौर्याची यशोगाथा सांगणारा ‘फर्जंद’ चित्रपट १ जूनला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. खरंतर, या आठवड्यात बॉलीवूडचा ‘रेस ३’ हा बडा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने, या आठवड्यात एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. विशेष म्हणजे ‘फर्जंद’ चांगली कमाई करत असताना, या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे काही थिएटरमधून ‘फर्जंद’ चे शो कमी करण्यात आले. थिएटरमधून चित्रपटाचे शो कमी करण्यात आले असताना देखील महाराष्ट्रातील सिंगल स्क्रीन व मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरतो आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

हिंदी चित्रपटांमुळे ‘फर्जंद’ चित्रपटाची होणारी गळचेपी मराठी चित्रपटसृष्टीसाठी खेदाची बाब आहे. असे असतानाही हिंदी चित्रपटांच्या तुलनेत ‘फर्जंद’ चित्रपटाचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या आठवड्यात फर्जंदला राज्यभरात ३०२ थिएटर्स आणि ४५० शो मिळाले होते, तर  दुसऱ्या आठवड्यात २४० थिएटर्स ३९१ शो असताना फर्जंदच्या कमाईत २ ते ३ टक्क्यांचा फरक होता. कमी थिएटर आणि शो असूनही मिळणारा प्रतिसाद उत्तम होता. शुक्रवारी सुरु झालेल्या तिसऱ्या आठवड्यात १६२ थिएटर्स आणि २३० शो ‘फर्जंद’ ला मिळाले आहेत.

प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिसादामुळेच अनेक अडचणींवर मात करत ‘फर्जंद’ची यशस्वी घौडदौड सुरु आहे. चांगल्या कलाकृतीला प्रेक्षकांची साथ मिळाली तर मराठी चित्रपटही मोठे यश मिळवू शकतो हे ‘फर्जंद’ चित्रपटाने सिद्ध केले आहे.


मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांपाठोपाठ शुक्रवारपासून प्रेक्षकांनीही ‘फर्जंद’वर स्तुतीसुमनांची उधळण सुरू केल्याने या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच चांगला व्यवसाय करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिकीटं न मिळालेल्या सिनेरसिकांना ‘फर्जंद’ न पाहताच निराश होऊन घरी परतावं लागलं. ‘फर्जंद’ पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे या सिनेमाच्या सकारात्मक प्रचाराला अशी काही सुरुवात झाली की, सिनेमा पाहू न शकलेल्या प्रेक्षकांनी काही ठिकाणी आंदोलनंही केली. त्यामुळे निर्मात्यांना सिनेमाच्या शोजची संख्या वाढवावी लागली.

Web Title: In the third week, the movie 'Firzand' has already begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.