Baal Bhaarti Movie Review : पास की फेल कसा आहे सिद्धार्थ जाधवचा 'बालभारती'? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: December 3, 2022 03:59 PM2022-12-03T15:59:58+5:302022-12-03T16:00:34+5:30

Baal Bhaarti Movie Review : चित्रपटात सिद्धार्थ जाधवच्या माध्यमातून एका वडिलांची व्यथा मांडण्यात आली आहे.

Siddharth Jadhav and Abhijeet khandkekar starrer Baal Bhaarti Movie Review | Baal Bhaarti Movie Review : पास की फेल कसा आहे सिद्धार्थ जाधवचा 'बालभारती'? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Baal Bhaarti Movie Review : पास की फेल कसा आहे सिद्धार्थ जाधवचा 'बालभारती'? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, रविंद्र मंकणी, आर्यन मेंघजी, उषा नाईक, संजय मोने
लेखक-दिग्दर्शक : नितीन नंदन
निर्माते : संजोय वाधवा, कोमल वाधवा
शैली : कॅामेडी ड्रामा
कालावधी : एक तास ४९ मिनिटे
दर्जा : तीन स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे

आजच्या इंग्रजाळलेल्या जगात इंग्रजी बोलता न येणाऱ्यांच्या मनात एक भीती असते. आपल्याला इंग्रजी बोलता येत नसलं तरी आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यायला हवं या हट्टापायी ते मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत प्रवेश घेतात. याचा मुलांच्या भावविश्वावर काय परिणाम होतो आणि त्यांचा विकास कसा खुंटतो त्याचं चित्रण दिग्दर्शक नितीन नंदननं या चित्रपटात केलं आहे.

कथानक : चित्रपटाची कथा चिन्मय नावाच्या हुषार मुलाची आहे. त्याचे वडील राहुल देसाईंचं इलेक्ट्रॉनिक दुकान आहे, तर आई सुनिता गृहिणी आहे. चिन्मयला नावीन्यपूर्ण शोध लावण्याची सवय असते. आजीचा विसराळूपणा लक्षात घेऊन तो ‘लोकेशन बिपर’ बनवतो. त्यामुळे जेव्हा आजी हरवेल तेव्हा ती जिथे असेल तिथले ठिकाण त्याला त्या यंत्रांच्या माध्यमातून कळू शकेल, अशी ती शक्कल असते. दारावरच्या बेलवर वेगवेगळे प्रयोग करतो. त्याच्या वडिलांना इंग्रजी बोलता येत नसतं. त्याची त्यांना खंतही नसते, पण जेव्हा एक मोठी संधी हुकते तेव्हा त्यांना इंग्रजीचं महत्त्व समजतं. त्याचवेळी ते आपल्या मुलाला मराठी शाळेतून काढून इंग्रजी शाळेत घालण्याचा निर्णय घेतात. यात त्यांना सुनिताचीही साथ मिळते. त्याचा चिन्मयवर काय परिणाम होतो ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : एका सुरेख वनलाईनवर बनलेला हा चित्रपट आहे. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिलं तर ते लगेच आत्मसात करतात. इंग्रजीचा अट्टाहास धरणं चुकीचं असल्याचं पालकांनी समजायला हवं हा संदेश या चित्रपटाद्वारे दिला आहे. इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत या मुद्द्याकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे. पटकथेत काही मुद्दे खूप छान पद्धतीने मांडण्यात आले असले तरी काहीशी संथ गती चित्रपटाला मारक ठरते. मराठी शाळेत शिकून मोठ्या हुद्द्यावर गेलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या मागच्या पिढीला मोटीव्हेट करण्यासाठी परतण्याचा मुद्दाही छान आहे. सिद्धार्थ जाधवच्या माध्यमातून एका वडिलांची व्यथा मांडण्यात आली आहे. कॅमेरावर्क, पार्श्वसंगीत, गीत-संगीत चांगलं आहे. इंग्रजी भाषा यायला हवी, पण त्याची सक्ती नको. मुलांना मातृभाषेत त्यांच्या कलेनं शिकण्याची मोकळीक द्यायला हवी. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन मुलांना गाणी आणि खेळांच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याची गरज असल्याचं अधोरेखित करण्यात आलं आहे.

अभिनय : बऱ्याचदा विनोदी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सिद्धार्थसाठी ही अतिशय महत्त्वाची भूमिका होती. विनोद आणि गांभीर्याचा ताळमेळ साधत सिद्धार्थनं ती अचूकपणे साकारली आहे. नंदिता पाटकरचं कॅरेक्टर खूप विचार करणारं असून, तिनं ते संयतपणे साकारलं आहे. 'बाबा' चित्रपटानंतर पुन्हा एकदा आर्यन मेंघजी या बालकलाकाराच्या अभिनयाची कमाल पहायला मिळते. अभिजीत खांडकेकर हे या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज असून, अभिजीतनं त्यातही जीव ओतला आहे. उषा नाईक यांनी आजीची भूमिका छान साकारली आहे. रवींद्र मंकणी यांनी वठवलेले निष्ठावंत शिक्षक जुन्या काळातील शिक्षकांची आठवण करून देणारे आहेत. संजय मोने यांनीही आपली व्यक्रिरेखा उत्तमप्रकारे साकारली आहे.

सकारात्मक बाजू : वनलाईन, पटकथेतील मुद्दे, अभिनय, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : चित्रपटाची संथ गती, संकलन
थोडक्यात : एका चांगल्या हेतूने बनवलेल्या या चित्रपटात जरी काही उणीवा राहिल्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसोबत एकदा तरी पहायला हवा.


 

Web Title: Siddharth Jadhav and Abhijeet khandkekar starrer Baal Bhaarti Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.