The shooting of Manache Shlok first Marathi movie that took place after the lockdown | लॉकडाउननंतर पार पडले या पहिल्या मराठी सिनेमाचे शूटिंग, या कलाकारांच्या आहेत भूमिका

लॉकडाउननंतर पार पडले या पहिल्या मराठी सिनेमाचे शूटिंग, या कलाकारांच्या आहेत भूमिका

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सृष्टी थांबली होती. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. सलग ३ महिने चित्रीकरण नाही म्हंटल्यावर नवीन चित्रपटाचे प्रदर्शन ही लांबणीवर गेले. आता मात्र अनलॉकमुळे मनोरंजन सृष्टी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. ऑनलाइन बिनलाईन, बघतोस काय मुजरा कर, मी पण सचिन अशा अनेक वेगळ्या आशय विषयाच्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या गणराज असोसिएट्सची आणि संजय दावरा फिल्मसची निर्मिती असलेला मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' हा सिनेमाचे जवळ-जवळ पूर्ण चित्रीकरण करून झाले होते. अवघ्या दोन दिवसांच्या आणि महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण लॉकडाउनमुळे राहून गेले होते ते अनलॉकची बातमी मिळताच चित्रपटाच्या टीमने पूर्ण केले. 


अनलॉक १ ची घोषणा होताच अनेकांना आशेचा एक किरण दिसू लागला होता. लॉकडाऊनच्या काळात कलाकार चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट बघत होते. अनलॉकची घोषणा होताच अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी सज्ज झाले होते. गणराज असोसिएट्स आणि संजय दावरा फिल्म्स निर्मित मनाचे श्लोक या चित्रपटाचे सुद्धा असेच काहीसे झाले होते. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांची प्रमुख भूमिका आहे. अभिजित अब्दे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाच्या काही महत्वाच्या दृश्यांच्या चित्रीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता परंतु लॉकडाऊनमुळे चित्रीकरण करणं शक्य झाले नाही. राज्य सरकारने चित्रीकरणाला परवानगी देताच या चित्रपटाच्या टीमने नवीन आराखडा आखत चित्रीकरण पूर्ण करण्याचे ठरवले. 


‘शासनाने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे हे कळताच आम्ही सगळेच कामला लागलो. चित्रीकरण स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो आणि सर्व नियम पाळून चित्रीकरण करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आणून देत आम्ही परवानगी मिळवळी' असे चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव यांनी सांगितले. तर निर्माते संजय दावरा या विषयी सांगतात 'आम्ही एक टीम आहोत, हे चित्रपट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो. चित्रीकरणाची परवानगी मिळताच सॅनिटाइझेशन, ग्लोवस ,मास्क या सगळ्यागोष्ठी आम्ही आमच्या टीम ला दिल्या आणि नियमानुसार चित्रीकरणाला सुरूवात केली.' 


उरलेलं चित्रीकरण कधी करता येईल हे माहितीच नव्हतं तरी नंतर वेळ घालवायचा नाही म्हणून अर्धी तयारी आधीच करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीची मांडणी कशी करता येईल या पासून ते कमी लोकांसोबत काम कसे करावे हे सुद्धा आम्ही प्लॅन करून ठेवलं होतं आणि म्हणून हे उरलेलं संपूर्ण चित्रीकरण दोन दिवसात संपवता आलं.'अस मृण्मयी देशपांडे तिच्या या दुसऱ्या दिग्दर्शनीय अनुभवाविषयी सांगते.

सरकारच्या नियमानुसार चित्रीकरण संपूर्ण टीम ऐवजी अवघ्या ३५% टक्के असल्यामुळे टीम मधल्या प्रत्येकाने ३ माणसाची काम एकट्याने केली.  मुळशी रोड वरील गरुड माची या गावात चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर संपूर्ण गाव सॅनिटाइझ करण्यात आलं. चित्रीकरणाच्या दरम्यान कलाकारांनी स्वतःचा मेकअप स्वतःच केला. याच बरोबर हे चित्रीकरण सुरू करण्याअगोदर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी गावात पोहोचताच स्वतःहून काही दिवस क्वॉरनटाईन झाली होती. तसेच सोशल डिस्टनसींगचे सर्व नियम पाळत आणि त्याचबरोबर सॅनिटाइझेशन, ग्लोवस ,मास्क या गोष्टींची योग्य ती खबरदारी घेत हे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गणराज असोसिएट्स मनाचे श्लोक या चित्रपटानंतर सुद्धा मराठी प्रेक्षकांसाठी वेगळ्या विषयांचे आशयघन चित्रपट घेऊन येत असून 'बघतोस काय मुजरा कर २' आणि 'फकाट' हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The shooting of Manache Shlok first Marathi movie that took place after the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.