Saurabh Gokhale considered Shivaji Maharaj as being thankful | सौरभ गोखलेने शिवाजी महाराजांचे मानले आभार
सौरभ गोखलेने शिवाजी महाराजांचे मानले आभार

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असून या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखलेने शिवाजी महाराजांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर त्याने शिवाजी महाराजांच्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


सौरभ गोखले याने सोशल मीडियावर स्वतःचा शिवाजी महाराजांच्या गेटअपमधील फोटो शेअर करीत म्हटले की, अंगावर चढवलेला हा पोशाख म्हणजे विश्वास, पराक्रम, जबाबदारी, साहस, शालीनता, संयम, न्याय अशा नानाविध गुणांचे परिमाण ठरतो. कारण हा पोशाख म्हणजे आमची अस्मिता आहे, माझ्या महाराजांच्या विचारांची, आचारांची, लौकीकतेची, पराक्रमाची साक्ष देणारा आहे. हा पोशाख परिधान करायला मिळणं हे कृतकृत्य होण्यासारखेच आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन करून कृतज्ञता व्यक्त करतो आहे. महाराज आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. आज गडावर हर्ष दाटला होतो जयजयकार, शिवनेरीवर सूर्य जन्मला अन मिटला अंधार, हिंदुत्वाची कास धरोनि केली रणनीती, धर्मरक्षणा जणू घेतला रुद्राने अवतार, जय भवानी जय शिवराय !!

अभिनेता सौरभ गोखले याने छोट्या व मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडली आहे. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. विविध मालिकांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. यानंतर मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरसुद्धा त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याच अभिनयाच्या जोरावर सौरभने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रोहित शेट्टी दिग्दर्शित व रणवीर सिंग अभिनीत सिम्बा चित्रपटात सौरभ निगेटिव्ह भूमिकेत झळकला होता. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

Web Title: Saurabh Gokhale considered Shivaji Maharaj as being thankful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.