Riteish and Genelia's Diwali gift for fans, 'Ashechi Roshanai' | रितेश आणि जेनेलियाचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट, 'आशेची रोषणाई'मधून ही जोडी आली भेटीला

रितेश आणि जेनेलियाचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट, 'आशेची रोषणाई'मधून ही जोडी आली भेटीला

दिवाळी हा सण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते, यंदाही दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी कोरोना, लॉकडाउन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साहाला मात्र नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ने ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. या शॉर्टफिल्ममधून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. इतकेच नाही तर प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल आणि रितेश व जेनेलिया ही दिग्गज मंडळी या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.


या विषयी बोलताना शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर महेश लिमये म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली, यातून ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली. या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकता क्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लेखणीतून उत्तम उतरवली आहे. संगीतकार अजय – अतुल यांनी अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज ‘आशेची रोषणाई’ला चढवला आहे तर रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी चार चाँद लावले आहेत.” 


निर्माते पुनीत बालन म्हणाले,  ‘आशेची रोषणाई’ बघून नागरिक आपल्या जवळपासच्या गरजूंना छोटीशी मदत करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.”


निर्माते पुनीत बालन यांची संकल्पना असलेली ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची सामाजिक संदेश देणारी सलग तिसरी निर्मिती  आहे. या शॉर्टफिल्मचे छायांकन आणि दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. पार्श्वसंगीत संगीतकार अजय-अतुल यांनी दिले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे व ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा व्हाइस ओव्हर लाभला आहे. ‘आशेची रोषणाई’चे क्रिएटिव्ह हेड विनोद सातव आहेत, तर कार्यकारी निर्माते म्हणून अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riteish and Genelia's Diwali gift for fans, 'Ashechi Roshanai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.