रिंकू राजगुरूच्या नवीन चित्रपटाची झाली घोषणा, म्हणतेय आठवा रंग प्रेमाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:23 IST2021-03-16T18:21:55+5:302021-03-16T18:23:01+5:30
रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे.

रिंकू राजगुरूच्या नवीन चित्रपटाची झाली घोषणा, म्हणतेय आठवा रंग प्रेमाचा
आपल्या सौंदर्याने आणि अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना आठवा रंग प्रेमाचा दाखवणार आहे. आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.
आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रॉडक्शनने आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. एए फिल्म्स हा चित्रपट वितरित करणार आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचसोबत विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे.
प्रेम ही संकल्पनाच चिरंतन राहणारी असल्याने आतापर्यंत प्रेमावरचे अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. आठवा रंग प्रेमाचा हा चित्रपट प्रेमाचा वेगळा रंग दाखवणार आहे. त्यामुळे आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल.
समीर कर्णिक यांनी क्युं हो गया ना.. या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर यमला पगला दिवाना, चार दिन की चांदनी, हिरोज, नन्हे जैसलमेर अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधला मोठा अनुभव गाठीशी घेऊन समीर आता निर्माता म्हणून मराठीत पहिलं पाऊल टाकत आहेत. आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.