Pinjara Movie Old Song Aali thumkat naar lachkat New Version In Mumbai Pune Mumbai 3 Movie | ‘पिंजरा’तील नार ठुमकत पुन्हा रसिकांच्या भेटीला, मुंबई-पुणे-मुंबई ३ सिनेमात नव्या रुपात
‘पिंजरा’तील नार ठुमकत पुन्हा रसिकांच्या भेटीला, मुंबई-पुणे-मुंबई ३ सिनेमात नव्या रुपात

जसजसे सिनेमा प्रदर्शनाची वेळ जवळ जवळ येत आहे तसे ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये दडलेली एकेक रहस्ये आता उलगडू लागली आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे चित्रपटात ‘पिंजरा’ या १९७२ मध्ये आलेल्या अजरामर चित्रपटातील “कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी... आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी...ग साजनी” हे गाजलेले गीत या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांनीही या गाण्यात फुल्टू धमाल केली आहे आणि त्यांचे हे नृत्य पाहण्यासारखे झाले आहे.

या गाण्याचे प्रकाशन ढोल ताशांच्या निनादात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे कलाकार उपस्थित होते.

 

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते व एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) यांनी या रहस्यावरील पडदा आज उलगडला. प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या ‘पिंजरा’ चित्रपटातील हे गाणे ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे. ‘पिंजरा’तील या गाण्याच्या चित्रपटातील समावेशामुळे रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्यामुळे अधिकच ताणली जाणार आहे.

 

‘गं साजणी’ या गाण्याचे पुनर्जीवित केले गेले असून त्याला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे तर आदर्श शिंदे यांचा आवाज आहे. मूळ गाणे जगदीश खेबुडकर यांचे असून त्यात विश्वजित जोशी यांनी भर घातली आहे. अतिरिक्त ऱ्हीदम प्रोग्रॅमिंग सुदेश गायकवाड यांचे आहे. या गाण्याचे चित्रीकरण साऊंडडिज येथे झाले असून ते किट्टू मायक्कल यांनी केले आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग एव्हीजे स्टुडीओजचे आहे. गाण्याच्या संगीत कलाकारांमध्ये सोमू सील (गिटार) व कोरस गायकांचा समावेश आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे.

 

सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे, ख्यातनाम दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे जुळलेले यशस्वी समीकरण पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा ते यशस्वी ठरणार आहे ते ‘मुंबई पुणे मुंबई-३’च्या माध्यमातून. पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रोहिणी हट्टगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे हे मराठीतील लोकप्रिय कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

 

पहिल्या दोन भागांच्या लोकप्रियतेच्या माध्यमातून गौतम आणि गौरी ही स्वप्नील-मुक्ताची जोडी आज घराघरात पोहोचली असून त्यांच्या जीवनात पुढे काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तर अलीकडेच यातील एक गाणेही प्रकाशित झाले. त्यातून प्रेक्षकांना कथेच्या पुढील प्रवासाचा अंदाज आला असून या ‘संपूर्ण कुटुंबा’ला भेटण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

 

‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या माध्यमातून ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाण्यास सज्ज झाली आहे. सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनासह ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर येत आहे.

 

चित्रपटातील गाणी देवयानी कर्वे-कोठारी, पल्लवी राजवाडे आणि अश्विनी शेंडे यांनी लिहिली आहेत. तर ती आनंदी जोशी, सई टेंभेकर, वर्षा भावे आणि योगिता गोडबोले यांनी गायली आहेत. चित्रपटाचे संगीत अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर आणि राम कदम यांचे आहे.

 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.


Web Title: Pinjara Movie Old Song Aali thumkat naar lachkat New Version In Mumbai Pune Mumbai 3 Movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.