मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर अभिनेता भाऊ उर्फ भालचंद्र कदम यांचा जानेवारी महिन्यात 'नशीबवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. झी टॉकिज वाहिनीवर येत्या रविवारी, १९ मे रोजी 'नशीबवान' या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' पहायला मिळणार आहे.

नशीबवान चित्रपटात महानगर पालिकेत काम करणाऱ्या एका अतिसामान्य कामगाराची कथा रेखाटण्यात आली आहे. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या बबनरावला अचानक पैशांचे घबाड लाभल्याने, त्याचे आयुष्य कसे बदलून जाते, ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पालिका कर्मचारी 'बबनराव' ही मुख्य भूमिका भाऊ कदम यांनी उत्तमरीत्या साकारली आहे.


या सिनेमाचे चित्रीकरण सेटचा फार वापर न करता वास्तववादी पद्धतीने करण्यात आले आहे. बबनराव रस्त्याची सफाई करत असल्याचा प्रसंग दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी चित्रित करण्यात आला. फटाक्यांचा व फुलांचा कचरा यावेळी रस्त्यावर पडलेला होता. अभिनेता भाऊ कदम स्वतः आपल्यासोबत, आपल्यात मिसळून काम करत आहे हे कळल्यावर तेथील कर्मचारी खूपच खुश झाले. हवी असलेली सर्व मदत त्यांनी स्वतःहून केली. त्यांचा आवडता, लाडका अभिनेता त्यांच्यासोबत वावरतो आहे हे त्यांच्यासाठी फार आनंदाचे क्षण होते. चित्रपटातील एका प्रसंगात बबनराव ट्रक घेऊन पळून जातात असे दाखवण्यात आले आहे. आजूबाजूच्या लोकांना चित्रीकरण सुरु असल्याचे ठाऊकच नसल्याने पालिका कर्मचारी असे का वागतो आहे, हे कुणालाही कळेनासे झाले होते. चित्रपटाच्या सेटवर हा गमतीशीर किस्सा सगळ्यांच्याच लक्षात राहिला.

सेटवर या अशा गमतीशीर घटना घडल्या, त्याप्रमाणे चित्रपट सुद्धा प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करतो. पण, पैशांचा लोभ सुटलेल्या बबनरावची परिस्थिती त्यामुळे कशी बिकट होते हे चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहे. यशस्वी होण्यासाठी लोभी वृत्ती असू नये ही शिकवणदेखील हा चित्रपट देऊन जातो.

प्रत्येकाचा यशाकडे जाण्याचा मार्ग वेगवेगळा असतो, त्यामुळे योग्य मार्गाने चालत राहावे असेही हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला उमजते. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? पैशांचा लोभ माणसाचं कशाप्रकारे नुकसान करू शकतो? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका 'नशीबवान' रविवार १९ मे रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता.


Web Title: Palika employee confuesd because of Bhau Kadam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.