No one made friends at school saying your body smells of dung, read Neha Khan's tough journey | 'अंगाला शेणाचा वास येतो म्हणत शाळेत कोणीच केली नाही मैत्री', वाचा नेहा खानचा खडतर प्रवास

'अंगाला शेणाचा वास येतो म्हणत शाळेत कोणीच केली नाही मैत्री', वाचा नेहा खानचा खडतर प्रवास

अभिनेत्री नेहा खान सध्या देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत एसीपी दिव्या सिंगची दमदार भूमिका साकारत आहे. नेहा खानने शिकारी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नेहाचा बालपणापासूनचा प्रवास फारच खडतर होता. तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले होते. 

नेहा खान मूळची अमरावतीची. तिची आई मराठी तर वडील मुस्लिम त्यामुळे दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. नेहाच्या वडिलांचे अगोदरच दोन लग्नही झाली होती तरीही एकमेकांवरील प्रेमामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संपत्तीचे वाटेकरी नकोत म्हणून नेहाच्या वडिलांची दुसरी पत्नी नेहाच्या आईवर दबाव आणत असे यातूनच नेहाच्या आईने आपल्या मुलांसह वेगळे राहणे पसंत केले होते. दरम्यान आईला मारण्यासाठी तिने गुंडही पाठवले होते. या घटनेत नेहाची आई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती तिला दवाखान्यात दाखल केल्यावर संपूर्ण शरीरावर ३७० टाके घालण्यात आले त्यामुळे तिचा केवळ एकच डोळा उघडा दिसत असल्याचे पाहून नेहा आणि तिचा भाऊ खूपच घाबरून गेले होते. एवढ्या बालवयात या दोघा चिमुरड्यानी लोकांकडून पैसे गोळा करून आईवर उपचार केले. जवळपास दोन वर्षे अंथरुणाला खिळून असलेली तिची आई आणि त्यातच वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे उदारनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहा आणि तिच्या भावाने मिळेल ती कामे करण्यास सुरुवात केली पेपर वाटणे, लोकांच्या घरची धुणीभांडी करून या दोघांनी आपल्या आईला दुःखातून बाहेर काढले. त्यानंतर आईनेही लोकांच्या घरची धुणीभांडी करण्यास सुरुवात केली, मेस चालवली. थोडे पैसे जमा झाल्यावर एक म्हैस..मग दोन म्हैस खरेदी करून संसाराचा गाडा सुरळीत चालवला. मात्र म्हशीचे दूध काढणे, शेण काढण्याची जबाबदारी नेहावर येऊन पडली.


अंगाला शेणाचा वास येतो म्हणून शाळेत कोणीच तिच्याशी मैत्री करत नसे, ना कोणी तिच्या जवळ बसत असे. शाळेची फी भरायला पैसे नसल्याने ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना बाहेर उभे केले जायचे. त्यामुळे पुरेशा पैशाअभावी पुढील शिक्षणासाठीही तिचे फारसे मन रमले नाही. मात्र काहीतरी करायला हवे या हेतूने मॉडेलिंगचे वेध तिला लागले. एकदा असेच फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेली असता तिचा फोटो पेपरात छापला तर चालेल का? असे स्टुडिओवाल्याने विचारले त्यावेळी “मी खरंच सुंदर आहे का ?” अशी एक गोड भावना तिला स्पर्शून गेली कारण याअगोदर आरशात पाहून नटणेमुरडणे तिला कधी माहीतच नव्हते. 


अभिनयाच्या वेडापायी स्वप्नाची नगरी मुंबई गाठायचे ठरवले. वडील विरोध करणार म्हणून केवळ आईशीच बोलून ऑडिशनसाठी ती मुंबईत दाखल व्हायची. इथे आल्यावर रेल्वेस्टेशनवरील वॉशरूममध्ये ५ रुपये देऊन मेकअप करायची. यात बरेच चांगले वाईट अनुभव तिच्या वाट्याला आले. मुंबईत जेव्हा जेव्हा येईल तेव्हा स्टेशनवरच रात्र काढावी लागत असे. पुढे अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग स्कुलमध्ये तिने प्रवेश मिळवला. एक महिन्याचा कोर्स करत असताना तिथेच असलेल्या अमरजीत या वृद्धव्यक्तीशी ओळख झाली. वृद्ध असल्याने शरीराची हालचाल मंदावलेल्या अमरजित यांची नेहा मदत करायची. अमरजित यांनी अनेक कलाकारांना घडवले होते तर त्यांची मुले देखील दिग्दर्शक होती त्यामुळे मी तुला काम मिळवून देतो असे आश्वासन त्यांनी नेहाला दिले होते. मुंबईत मालाडला तिला राहण्यासाठी घरही दिले. जिमी शेरगिल सोबत “युवा” चित्रपटात तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बोर्डर्स सारख्या चित्रपटातून काम केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: No one made friends at school saying your body smells of dung, read Neha Khan's tough journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.