Mithali Mayekar's 'Hashtag Prem' is being talked about everywhere | मिताली मयेकरच्या 'हॅशटॅग प्रेम'ची सर्वत्र होतेय चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मिताली मयेकरच्या 'हॅशटॅग प्रेम'ची सर्वत्र होतेय चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मिताली मयेकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच ती तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. लवकरच ती हॅशटॅग प्रेम या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील टायटल साँग नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 


 “दोस्तीवाली फ्रेम, हॅशटॅग प्रेम...’’ अशी मनमोहक शब्दरचना असलेलं ‘हॅशटॅग प्रेम’मधील टायटल साँग आपला जलवा दाखवत आहे. गीतकार कौतुक शिरोडकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं टायटल साँग संगीतकार प्रविण कुवर यांनी रूपाली मोघे यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. आशिष पाटील यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. प्रविण कुवर यांच्या संगीताचा बाज इतर संगीतकारांपेक्षा काहीसा वेगळा असून, आजवर नेहमीच तो त्यांनी जपला आहे. याच कारणामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी तळागाळातील रसिकांनी कायम डोक्यावर घेतली आहेत. ‘हॅशटॅग प्रेम’ या सिनेमाचं टायटल साँग मात्र त्यांनी सर्व प्रकाराच्या रसिकांना नजरेसमोर ठेवून केलं असल्यानं हे गाणं अल्पावधीत रसिकांच्या ओठांवर सजू लागलं आहे. सहजसुंदर शब्दरचनेला नावीन्यपूर्ण तरीही लयबद्ध संगीताची लाभलेली साथ हे या गाण्याच्या लोकप्रियतेचं गमक असल्याचं संगीतकार प्रविण कुवर यांचं मत आहे.


निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली या आजच्या युगातील प्रेमकथेची निर्मिती केली असून दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्याने हा सिनेमा रसिकांसमोर प्रस्तुत केला जाणार आहे.
    ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा शीर्षकावरून जरी केवळ आजच्या तरूणाईचं प्रतिनिधीत्व करणारा वाटत असला तरी, यात सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी काही ना काही असल्यानं ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा प्रत्येकाला आपलासा वाटावा असा असल्याचे मत दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी व्यक्त केलं. ‘हॅशटॅग प्रेम’ हे आजच्या जमान्यातील शीर्षक या सिनेमातील नावीन्य दर्शवणारं असून, याचा उलगडा पटकथेतही अचूकपणे करण्यात आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं सर्वतोपरी मनोरंजन करेल असा ठाम विश्वास निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी व्यक्त केला आहे. नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचे सिनेमे सादर करण्यात अग्रस्थानी असलेल्या पिकल एंटरटेनमेंटने ‘हॅशटॅग प्रेम’च्या रूपात आणखी एक आशयघन सिनेमा रसिक दरबारी सादर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे.


    मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी या सिनेमाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणारी आहे. गायक-संगीतकार रोहित राऊतने या सिनेमाला पार्श्वसंगीत देत संगीत विभागात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून, कार्यकारी निर्माते महेश भारंबे आहेत. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांची सिनेमॅटोग्राफी तर केशव ठाकूर यांचं कला दिग्दर्शन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल. ‘हॅशटॅग प्रेम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mithali Mayekar's 'Hashtag Prem' is being talked about everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.