Mahesh Limaye's 'Jaggu and Juliet' announced, 90% shooting to be done in Europe | महेश लिमयेच्या 'जग्गू आणि ज्युलिएट' चित्रपटाची केली घोषणा, ९० टक्के चित्रीकरण होणार युरोपमध्ये

महेश लिमयेच्या 'जग्गू आणि ज्युलिएट' चित्रपटाची केली घोषणा, ९० टक्के चित्रीकरण होणार युरोपमध्ये

मराठीसह बॉलीवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या महेश लिमयेला ‘यलो’ या संवेदनशील विषयावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा महेश लिमये दिग्दर्शक म्हणून 'जग्गु आणि  ज्युलिएट’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. तर आपल्या अनोख्या संगीताच्या माध्यमातून मराठीसह बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल 'जग्गु आणि  ज्युलिएट’ च्या निमित्ताने आपल्या मराठी चाहत्यांना बहारदार संगीत आणि पार्श्वसंगीताची  खास मेजवानी घेऊन येणार आहेत. महेश लिमये, गणेश पंडित आणि अंबर हडप या त्रयींची ही जबरदस्त कथा आणि पटकथा असून  त्यातील प्रभावी संवाद हे गणेश पंडित आणि अंबर हडप यांचे आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलेले आहे. 

'जग्गु आणि  ज्युलिएट’च्या पोस्टरमध्ये कुणीतरी एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत आहे. त्याला लंडनच्या बिग बेनची पार्श्वभूमी लाभलेली आहे. अतिशय आकर्षक मांडणीमुळे लक्षवेधी ठरलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारे ते दोन हात नक्की कुणाचे आहेत? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार असून महेश लिमये यांच्या नजरेतून निसर्ग सौंदर्याने नटलेला युरोप या चित्रपटात हटके अंदाजात बघायला मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते पुनीत बालन म्हणाले, २०२१ मध्ये प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी वेगळ्या धाटणीचा 'जग्गु आणि ज्युलिएट’ हा  चित्रपट घेऊन येत आहोत. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना सहकुटुंब बघता येईल अशी एक अतिशय सुंदर, कलरफुल ‘रॉमकॉम’ कलाकृती भेट म्हणून देण्याचा आमचा मानस आहे.

निर्माते पुनीत बालन, दिग्दर्शक महेश लिमये आणि संगीतकार अजय – अतुल यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक शॉर्टफिल्मला जगभरातील रसिकांची पसंती मिळाली आहे. तसेच विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात या कलाकृतीला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आता ‘जग्गु आणि  ज्युलिएट’ च्या निमित्ताने हे त्रिकुट पुन्हा एकत्र आल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahesh Limaye's 'Jaggu and Juliet' announced, 90% shooting to be done in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.