छोट्या पड्यावरील 'लागिर झालं जी' ही मालिकेतील सगळ्या  व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. अजिंक्य आणि शीतल यांच्या प्रमाणे जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. काही कारणामुळे जयडी भूमिका साकारणारी किरण ढाणेने ही मालिका सोडली आणि त्यानंतर ती 'राजकन्या' मालिकेत झळकत आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर तिला  थेट सिनेमाची लॉटरी लागली.   'पळशीच्या पीटी' या सिनेमात ती झळकणार आहे.  किरण एका ध्येयवेड्या ऍथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे.याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे. 'पळशीची पीटी' हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलांचं भविष्य अधोरेखित करतो. 


कधी खट्याळ... कधी भोळसट.. अज्यावर जीवापाड प्रेम करणारी जयडी एकतर्फी प्रेमातून व्हिलनही बनते. किरणने साकारलेल्या या भूमिकेची वाहवा आजही ऐकू येते  तर 'राजकन्या' मधली समंजस किरण प्रत्येक आई-वडिलांची लाडकी झालीये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. किरणने आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा 'पळशीची पीटी' मधील भागीची भूमिका ही अधिक जोखमीची ठरेल. माळरानात मेंढपाळ करणाऱ्या साधारण कुटुंबात जन्मलेली ही भागी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते. या साहस कथेला सलाम करावासा वाटेल इतकी समरसून ही व्यक्तिरेखा किरणने साकारली आहे. 


अनेक नामांकन आणि पुरस्कार विजेत्या किरणला या व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, ''येणारी प्रत्येक संधी मी आव्हान म्हणून स्विकारते. अपेक्षांची उंची गाठायची असेल तर नवनवीन आव्हानं सुद्धा स्विकारता आली पाहिजे आणि ही ताकद मला माझ्या रोजच्या कामांतून मिळते'' असं किरण म्हणते.

 

 
'लागीरं झालं जी' मध्ये शितलीच्या काकाच्या भूमिकेतील अभिनेते धोंडिबा बाळू कारंडे यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आता त्यांच्यातल्या दिग्दर्शकाला देखील तितकीच लोकप्रियता लाभेल अशी आशा आहे. ग्रामीण  भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा 'पळशीची पीटी' हा त्यांचा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो.  मराठी मनोरंजन क्षेत्रात नावावरूनच कुतूहल जागं करणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सध्या रंगत असून येत्या २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: lagir zal ji fame jaidee aka kiran dhane's photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.