'Kaal' is the first Marathi film to be released in Russia | ‘काळ’ ठरला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट
‘काळ’ ठरला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट

‘काळ’ चित्रपटाने घोषणा झाल्यापासून आणि नंतर प्रदर्शित झालेल्या ट्रेलरच्या माध्यमातून चित्रपट रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्कंठा निर्माण केली आहे. आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नोंदवत चित्रपटाने रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होण्याचा मान पटकावला आहे. चित्रपट महाराष्ट्रात 31 जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत असून त्यानंतर तो रशियातील ३० शहरांमध्ये १०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चौथ्या बॉलीवूड चित्रपट महोत्सवात ‘काळ’चा प्रीमियर आयोजित केला जाणार आहे.

 ‘काळ’चा समाजमाध्यमांवरील ट्रेलर पाहून रशियातील कंपनीने आणि चित्रपट महोत्सव आयोजकांनी निर्माते आणि फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना रशियातील प्रदर्शनासाठी विनंती केली. “चित्रपटाचा विषय आणि चित्रपटाची हाताळणी याने आयोजक प्रभावित झाले होते. अशा विषयांना रशियामध्ये खूप मोठी मागणी असते. त्यानंतर या चित्रपटाचे रशियातील प्रदर्शन नक्की झाले. आमच्यासाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे की रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आमचा आहे,” असे उद्गार फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर यांनी काढले.

‘काळ’चे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी संदीप यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

रशियातील ‘काळ’च्या प्रदर्शनाची योजना आघाडीच्या विपणन कंपनीतर्फे आखली जात असून या कंपनीला तब्बल दहा वर्षांचा या क्षेत्रातील अनुभव आहे. ‘काळ’चा प्रीमियर महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मॉस्को येथे होणार असून तो ‘कारो ११ ऑक्टीबर’ या सर्वात मोठ्या प्रदर्शनस्थळी होत आहे. “चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच त्याचा दर्जा दिसून येतो. त्यामुळे हा चित्रपट रशियात प्रदर्शित झालाच पाहिजे असे आम्ही ठरवले. आम्ही दहा शहरांमध्ये किमान १०० पडद्यांवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची योजना आखली आहे,” अशी भूमिका कंपनीने पत्रकाद्वारे मांडली आहे. कंपनी अनेक सिनेमा साखळी, विविध वितरण आणि ऑनलाईन सिनेमा तसेच इतर प्रकारांमध्ये कार्यरत आहे. त्याशिवाय ती चित्रपट महोत्सवांचे आयोजनही करते.

Web Title: 'Kaal' is the first Marathi film to be released in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.