Javed Ali's Valentine Special song, 'Whats app Love' in the film | जावेद अलीचं व्हॅलेन्टाईन स्पेशल गाणं 'व्हॉट्सॲप लव' चित्रपटात

जावेद अलीचं व्हॅलेन्टाईन स्पेशल गाणं 'व्हॉट्सॲप लव' चित्रपटात

ठळक मुद्दे'शोना रे' गाण्याच्या निमित्ताने एका अदभूत ठिकाणाचे घडणार दर्शन

मध्य प्रदेशातील मांडवगड म्हणजे मांडूगड हा राणी रूपमती आणि राजे बाजबहाद्दूर यांच्या काळजाला चटका लावून जाणाऱ्या आणि अकबर बादशाहला प्रायश्चित करायला भाग पाडणाऱ्या अजरामर प्रेमकहाणीचा साक्षीदार आहे. ह्याच ऐतिहासिक प्रेमकहाणीला साक्ष असलेल्या आणि विंध्य पर्वतरांगेतील निसर्गरम्य पण, काहिसे गूढ भासणाऱ्या मांडू गडावरील जहाज महालात चित्रीत झालेले 'व्हॉट्सॲप लव' चित्रपटातील 'शोना रे' हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. 

जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याचे असंख्य मनसुबे आखले जात असताना, हे नितांत सुंदर दिसणारे, अवीट गोडीचे आणि त्यात जावेद अली सारख्या मेलडी किंगने गायलेले गाणे, मराठी संगीत प्रेमींसाठी व्हॅलेन्टाईन स्पेशल गिफ्ट ठरणार आहे. अजिता काळे यांचे बोल, नितीन शंकर यांचे संगीत आणि प्रख्यात गायक जावेद अली यांनी गायलेले हे सुमधूर गाणे हॅण्डसम हंक राकेश बापट तसेच सारेह फर ह्या इराणी अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आले आहे. विठ्ठल पाटील यांचे नृत्यदिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या सौंदर्यदृष्टीमुळे हे गाणे पाहणे, स्वत:लाच ट्रीट देण्यासारखे आहे.


इंदौर पासून जवळपास १०० कि.मि. अंतरावर विंध्य पर्वतराजीच्या कुशीत ३५ कि.मि. परिसरात मांडूगड वसलेला आहे. सौंदर्यवती राणी रुपमतीच्या संगीतकलेवर राजा बाजबहाद्दूर भाळला. दोघे कलाप्रेमी असल्याने एकमेकावर जीवापाड प्रेम करू लागले. पण दिल्लीचा बादशाह अकबर राजाने राणी रूपमतीचे प्रेम प्राप्त करण्यासाठी मांडवगडावर चाल केली. राजा बाजबहाद्दूरला बंदी केले. पण, राणी रुपमतीने अकबराला शरण येण्यापेक्षा प्रेमविरहात विषप्राषन करून मृत्युला कवटाळले. अकबर बादशाहला राणीचा मृत्यू जिव्हारी लागला. आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने, त्याने राजा बाजबहाद्दूरला रीहा केले, पण, राजा बाजबहाद्दूरने राणी रुपमतीचा मृत्यू सहन न झाल्याने तिच्या कबरीवर डोके आपटून जीव दिला. अशा ह्या हृदयस्पर्शी प्रेमकहाणीचा साक्षीदार असलेल्या मांडूगडावर आपल्या 'व्हॉट्सॲप लव' ह्या चित्रपटातील प्रेमगीत चित्रीत व्हावे, अशी कॉन्सर्ट शोमॅन, निर्माते-दिग्दर्शक हेमंतकुमार महालेंची इच्छा होती. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मनमोहक, रम्य पण काहिसे गूढ असल्याचा भास होणाऱ्या मांडूगडावर आजवर मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले नसल्याने प्रेक्षकांना 'शोना रे' गाण्याच्या निमित्ताने एका अदभूत ठिकाणाचे दर्शन घडणार आहे.

सहनिर्माते सत्यप्रकाश जोशी आणि अनुराग महाले यांनी शोना रे गाण्याच्या चित्रीकरणाकरीता मध्यप्रदेश सरकार तसेच इतर स्थानिक प्रशासकीय संस्थांकडून परवानगी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. पिकल एंटरटेनमेन्टच्या समीर दिक्षीत आणि ऋषिकेष भिरंगी यांच्या मार्फत ५ एप्रिल रोजी 'व्हॉट्सॲप लव' हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Web Title: Javed Ali's Valentine Special song, 'Whats app Love' in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.