कशी नशिबाने थट्टा आज मांडली... मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वृद्धाश्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:56 PM2021-05-14T13:56:38+5:302021-05-14T13:57:10+5:30

पन्नासच्या दशकातील या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या जुहू मधील बंगल्यावरून कायदेशीर वाद सुरू आहे.

How fate made a joke ..! It was time for the actress, who witnessed the golden age, to stay in the old age home | कशी नशिबाने थट्टा आज मांडली... मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वृद्धाश्रमात

कशी नशिबाने थट्टा आज मांडली... मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वृद्धाश्रमात

Next

पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत सोज्वळ नायिकांची प्रतिमा मोडून टाकून मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्यावर आप्त आणि नातेवाईक असूनही वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. त्यांना स्मृतिभ्रंश झाला असून सध्या त्या मुलुंडमधील ‘गोल्डन केअर’ या वृद्धाश्रमाच्या छत्रछायेत राहत आहेत. 

अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी ‘लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’, ‘बोलविता धनी’, ‘उमज पडेल तर’, ‘राम राम पाव्हणं’, ‘टिंग्या’ अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. चित्रा यांना तीन बहिणी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.एका मराठी वृत्तपत्रांने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, चित्रा नवाथे सध्या वृद्धाश्रमात राहत आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार,चित्रा यांच्या भगिनी सुधा परुळकर आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सरला नर्सिंग होममध्ये ठेवले होते.

वृद्धाश्रमात कशा पोहचल्याचे कारण अस्पष्ट

गेले वर्षभर त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी सांताक्रूझ येथील सरला नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आले होते. कोरोनाकाळातही त्या तिथेच उपचार घेत होत्या. मात्र या रुग्णालयाचे कोरोना केंद्रात रूपांतर केल्यानंतर चित्रा यांना तिथून जायला सांगितले. त्यानंतर त्या कुठे होत्या, याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती नव्हती. तब्बल तीन महिन्यांनतर त्या मुलुंडमधील ‘गोल्डन केअर’ या वृद्धाश्रमात असल्याची बाब समोर आली. त्या तिथे कशा पोहोचल्या हे अद्याप समजू शकले नाही. 

पोलिसांच्या मदतीनं शोधला ठावठिकाणा
चित्रा यांची धाकटी बहिण अभिनेत्री व दिग्दर्शिका मीना नाईक त्यांना पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नाईक दाम्पत्याने पोलिसांची मदत घेऊन चित्रा यांचा ठावठिकाणा शोधून काढला. मुलुंडमधील ‘गोल्डन केअर’ या वृद्धाश्रमात असलेल्या चित्रा यांना भेटण्याचीही परवानगी त्यांना दिली जात नव्हती, मात्र दोन दिवसांपूर्वी चित्रा यांचे भाचे ज्ञानेश सुखटणकर यांनी वृद्धाश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. वयोमानामुळे चित्रा यांना स्मृतीभ्रंश होत असल्याचे समोर आले.

जुहू मधील बंगल्यावरून कायदेशीर वाद
खरेतर चित्रा यांच्या जुहू मधील बंगल्यावरून कायदेशीर वाद सुरू आहे. या बंगल्यावरून कुटुंबात होणारा वाद मिटवण्यासाठी आम्ही आधीपासून प्रयत्न सुरू केले होते, आता पुन्हा एकदा एकत्र येऊन आम्ही त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मीना नाईक यांनी म्हटले आणि पुढे सांगितले की, त्यांच्या नावाने एका ट्रस्टची स्थापना करून त्यांचा सांभाळ करण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले जातील. त्यासाठी आम्ही एकत्र येऊन मार्ग काढत आहोत. चित्रा यांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या आधारासाठी सर्वच भावंडांनी आत्तापर्यंत योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबापासून दूर ठेवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सिनेकारकीर्द...

दादरला मिरांडा चाळीत राहणाऱ्या कुसूम आणि कुमूद सुखटणकर या बहिणींनी १९४५च्या दरम्यान मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले.१९५२ साली राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ या दोन्ही बहिणींचा नायिका म्हणून पहिला चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना या दोघींची जुन्या वळणाची वाटणारी नावे बदलून गदिमांनी त्यांचे नामकरण ‘चित्रा’ आणि ‘रेखा’ असे केले. पुढे चित्रा नावानेच कुसूम सुखटणकर यांची वाटचाल सुरू झाली.

मुलाचा आधारही गमावला..

प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांच्याकडे सह-दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजा नवाथे यांच्याबरोबर चित्रा यांचा विवाह झाला. चित्रा यांच्या मुलाचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला. २००५ साली त्यांचे पती राजा नवाथे यांचेही आजारपणाने निधन झाले. त्यामुळे जुहू येथील बंगल्यात एकट्या पडलेल्या चित्रा यांनी आपल्या इतर भावंडांचा आधार घेतला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How fate made a joke ..! It was time for the actress, who witnessed the golden age, to stay in the old age home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app