The first shooting schedule of prathamesh parab's 'takatak 2' has been completed in goa | प्रथमेश परबचा ‘टकाटक २’ लवकरच येणार भेटीला, सिनेमाचे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण

प्रथमेश परबचा ‘टकाटक २’ लवकरच येणार भेटीला, सिनेमाचे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण

‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटाने सकारात्मक पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आहे. दोन वर्षांपूर्वा जेव्हा ‘टकाटक’ प्रदर्शित झाला होता, तेव्हा मराठी सिनेसृष्टीला बॉक्स ऑफिसवर हिट ठरणा-या एका चित्रपटाची नितांत गरज होती. ‘टकाटक’नं ती पूर्ण केली. आता कोरोनामुळं संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये मरगळ आलेली असताना ‘टकाटक २’च्या टीमनं उत्साहवर्धक पाऊल उचलत गोव्यामध्ये शूटिंगचं पहिलं शेडयूल यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. वाढत्या कोरोना केसेसमुळे गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गोव्यात 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे. आता गोव्यातही कडक निर्बंध लागू केले जात असताना तिथले शूटिंग पूर्ण झाल्याने ‘टकाटक 2’ची टीम एकप्रकारे सुदैवी ठरली आहे.

 ‘टकाटक २’च्या टीमनं गोव्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व सरकारी नियमांचं अतिशय योग्य पद्धतीनं आणि काटोकोरपणे पालन करत शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक मिलिंद कवडे प्रेक्षकांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येत आहेत. पहिल्या भागाप्रमाणे दुस-या भागातील कथानकही अर्थातच तरूणाईवर आधारित आहे. असं असलं तरीही तरूणाईपासून थोरांपर्यंत सर्वचजण ‘टकाटक २’च्या कथानकाशी एकरूप होतील. महाराष्ट्रात शूटिंगला बंदी आहे, पण गोव्यामध्ये ‘टकाटक २’चं चित्रीकरण करताना संपर्ण टीमनं योग्य ते सहकार्य केल्यानं कोणतीही अडचण न येता पहिलं शेड्यूल पूर्ण करू शकल्याचं समाधान मिलिंद कवडे यांनी व्यक्त केलं आहे. 

    प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करणार असून अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘टकाटक २’ची कथा आणि पटकथालेखन मिलिंद कवडे यांनी केलं असून संवादलेखन किरण बेरड यांनी केलं आहे. हजरत शेख वली या चित्रपटाचे डीओपी आहेत तर निलेश गुंडाळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. गीतलेखन जय अत्रे यांनी केलं असून वरूण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. गोव्यातील शूटिंग शेडयूल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ‘टकाटक २’ची टीम मुंबईत परतली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The first shooting schedule of prathamesh parab's 'takatak 2' has been completed in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.