मराठी इंडस्ट्रीमध्ये 'बाप बेटा' जोडीचा ट्रेंड आता रुजू झाला आहे. यात आणखीन एका जोडीची भर पडलीय. मुळात ही जोडी आहे विजय गोखले आणि त्यांचे सुपुत्र आशुतोष गोखले यांची.  नाटक, मालिका आणि चित्रपटात अविरत काळ गाजवणारे विजय गोखले यांची अभिनय कारकीर्द सर्वश्रुत आहेतच. पण, त्यांचा मुलगा आशुतोष गोखले याने देखील अभिनयात आपली वेगळी छाप पाडली आहे.

आपल्या वडिलांचे काम जवळून न्याहाळणाऱ्या आशुतोषला लहानपणासूनच अभिनयाचे वेड लागले ते त्याच्या वडिलांकडूनच. सध्या, आशुतोष 'तुला पाहते रे' या मालिकेतील जयदीप हे पात्र साकारत असून, सध्या तो या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतेय.

तर विजय गोखले शंभर वर्षांपूर्वी अजरामर झालेल्या 'एकच प्याला' या नाटकावर आधारित 'संगीत एकच प्याला' या नव्या कोऱ्या संगीत नाटकाच्या दौऱ्यामध्ये मग्न झाले आहेत. पारंपरिक आणि आधुनिकतेचा साज असलेली 'बाप-बेटा'ची ही जोडी, आपापल्या व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नसली तरी, एकमेकांच्या कामाची दखल ते नक्कीच घेतात. 


याबद्दल आशुतोषला विचारले असता तो म्हणतो 'बाबा एक चांगले रंगकर्मी असून, ते एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकदेखील आहे. रंगभूमी असो वा मालिका असो, त्यांची आजवरची कामे मी पाहत आलो आहे. मात्र, त्यांच्यासोबत कधी एकत्र काम करण्याची संधी मला अद्याप मिळाली नाही आहे. त्यामुळे, बाबांनी दिग्दर्शित केलेल्या एका नाटकामध्ये काम करण्याची भरपूर ईच्छा आहे.'

किंबहुना, आशुतोषच काय तर येत्या काळात ही दोघेजण एकत्र पाहायला मिळावीत अशी प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे.

Web Title: Father's Day Special: Fathers and son trend in 'Gokhale and Son'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.