'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर पुन्हा दिग्पाल लांजेकरने उचलले शिवधनुष्य, लवकरच घेऊन येणार 'शेर शिवराज है'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:20 AM2021-02-19T10:20:46+5:302021-02-19T10:28:59+5:30

Digpal Lanjeka 'Sher Shivraj Hai' coming soon: लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Digpal Lanjekar coming with new movie 'Sher Shivraj Hai' | 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर पुन्हा दिग्पाल लांजेकरने उचलले शिवधनुष्य, लवकरच घेऊन येणार 'शेर शिवराज है'

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर पुन्हा दिग्पाल लांजेकरने उचलले शिवधनुष्य, लवकरच घेऊन येणार 'शेर शिवराज है'

googlenewsNext

हे कवी भूषण यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणारे काव्य बऱ्याच शिवभक्तांना मुखोदगत आहे. या अजरामर स्तुतीकाव्याचा इथे उल्लेख करण्यामागे एक विशेष कारण आहे. या काव्यातील 'शेर शिवराज है' हे ध्रुवपद आता एका मोठ्या मराठी सिनेमाचे शीर्षक बनले आहे. दिग्दर्शनाकडे वळल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे चित्रपटरूपाने जनतेसमोर आणणारा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्पालच्या याच सिनेमाचे शीर्षक 'शेर शिवराज है' असे आहे.

 

शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगभरातील बऱ्याच देशांच्या सैन्य दल अभ्यासक्रमांमध्ये अफझलखान वध प्रकरणाचा समावेश असून, यातील शिवरायांच्या रणनीतीचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जाते. गनिमी काव्याने लढलेल्या या युद्धातील विविध कंगोरे सैनिकांना समजावून सांगितले जातात. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरने अर्काइव्ह करण्याची प्रोसेस केल्यानंतर सैन्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी दिग्पालचा संपर्क आला. शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे, यातील 'शेर शिवराज है' हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करत आहे. आठ चित्रपटांपैकी 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमने उत्तम सादरीकरण केले असून, 'जंगजौहर' हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाबाबत सर्वांनाच खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे. ही गोष्ट नक्कीच उत्साह वाढवणारी असल्याचे दिग्पालचे मत आहे. 

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या 'जंगजौहर' या सिनेमांमुळे रसिकांच्या दिग्पालकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिग्पाल 'शेर शिवराज है' या चित्रपटासाठी खूप अभ्यास आणि रिसर्च करत आहे. अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. दिग्पालने आपल्या सिनेमांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'फर्जंद' या सिनेमात शिवराय मार्गदर्शकाच्या रूपात होते तर 'फत्तेशिकस्त'मध्ये स्वत: मैदानात उतरून नेतृत्व करताना रणनीतीज्ञाच्या भूमिकेत दिसले. 

उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीतीज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेच रूप 'शेर शिवराज है' या चित्रपटात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे. रयतेसाठी कनवाळू, श्रद्धा असलेला राजा ही जनतेच्या मनातील छत्रपतींची रूपेही प्रामुख्याने या सिनेमाद्वारे समोर येतील. त्याचबरोबर महाराजांचे भौगोलिक ज्ञान किती उत्तम होते हे देखील 'शेर शिवराज है' या सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून, लवकरच निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दिग्पाल सध्या 'शेर शिवराज है' सिनेमाचे पहिले पोस्टर व टीझरही लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीत आहे. दिग्पालची आजवरची कामगिरी पाहता 'शेर शिवराज है' या सिनेमाशी संबंधित असलेल्या आणखी काही गोष्टी जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतील पण त्यासाठी सर्वांनाच थोडी वाट पहावी लागणार आहे.

Web Title: Digpal Lanjekar coming with new movie 'Sher Shivraj Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.