Dharmaveer Movie Review: ठाण्याच्या ढाण्या वाघाची 'आनंद'यात्रा, जाणून घ्या कसा आहे प्रसाद ओक अभिनीत 'धर्मवीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 01:29 PM2022-05-13T13:29:59+5:302022-05-13T13:31:08+5:30

Dharmaveer Movie Review: कोण आनंद दिघे? हा प्रश्न जर कोणाला पडत असेल किंवा ठाण्याचा ढाण्या वाघ कोण? या प्रश्नांची उत्तरं जर कोणाला माहित नसतील, तर त्याचं उत्तर 'धर्मवीर' आहे.

Dharmaveer Mukkam Post Thane Movie Review | Dharmaveer Movie Review: ठाण्याच्या ढाण्या वाघाची 'आनंद'यात्रा, जाणून घ्या कसा आहे प्रसाद ओक अभिनीत 'धर्मवीर'

Dharmaveer Movie Review: ठाण्याच्या ढाण्या वाघाची 'आनंद'यात्रा, जाणून घ्या कसा आहे प्रसाद ओक अभिनीत 'धर्मवीर'

Next

कलाकार - प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, श्रुती मराठे, स्नेहल तरडे, विजय निकम, विघ्नेश जोशी, अभिजित खांडकेकर
लेखन-दिग्दर्शन - प्रवीण तरडे
निर्माते - मंगेश देसाई, झी स्टुडिओज
स्टार - चार स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे


कोण आनंद दिघे? हा प्रश्न जर कोणाला पडत असेल किंवा ठाण्याचा ढाण्या वाघ कोण? या प्रश्नांची उत्तरं जर कोणाला माहित नसतील, तर त्याचं उत्तर 'धर्मवीर' (Dharmaveer) आहे. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडेने आनंद दिघेंचा बायोपिक करताना त्याची डॅाक्युमेंट्री होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. ९५ चित्रपटांची शिदोरी सोबत घेऊन प्रथमच मिळालेल्या टायटल रोलचं प्रसाद ओक(Prasad Oak)नं सोनं केलं आहे. निर्मात्याच्या रूपात मंगेश देसाईनं या चित्रपटात एकनाथ शिंदेंच्या साक्षीनं जणू ठाण्याच्या राजकारणातील विठ्ठलाची महापूजा मांडली आहे.

कथानक :
महिला पत्रकार तट्टम आणि रिक्षावाला समीरच्या माध्यमातून चित्रपटाची सुरुवात होते. बॉलिवूडची पार्टी सोडून आनंद दिघेंची पुण्यतिथी कव्हर करायला पाठवल्यानं तट्टम नाराज असते. तिला दिघेंबद्दल काहीच माहित नसतं. दिघेंच्या समाधीस्थळाजवर पोहोचल्यावर तिथे जमलेली गर्दी पाहून ती पैसे देऊन जमवल्याचं तिला वाटतं, पण समीर तिचा गैरसमज दूर करतो. दिघेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाची एक स्टोरी असते. प्रत्येकाच्या जीवनात दिघेंचं वेगळं स्थान असतं. त्यापैकी काहींच्या आठवणींच्या माध्यमातून जे आनंद दिघे पडद्यावर पहायला मिळतात ते काही दृश्यांमध्ये भावुक करतात, काही ठिकाणी व्यवस्थेविरुद्ध मनात चीड निर्माण करतात. सिनेमाच्या शेवटीही काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहतात.

लेखन-दिग्दर्शन :

लेखनासोबतच प्रवीण तरडेनं दिग्दर्शनही चांगलं केलं आहे. अतिरंजितपणा किंवा मनोरंजक मूल्यांचा अतिवापर करण्याचं टाळल्यानं एक धगधगतं अग्निकुंड पडद्यावर पहायला मिळतं. पटकथेची बांधणी चांगल्या प्रकारे केल्यानं चित्रपट प्रत्येक दृश्यागणिक उत्सुकता वाढवतो. संवादलेखन मार्मिक आणि प्रसंगानुरुप आहे. दंगलीच्या वेळी दिघेंनी घेतलेली भूमिका, पोलिसांच्या डोळ्यांत धूळ चारून केलेलं हिंदू भगिनीचं रक्षण, हिंदू-मुस्लीम दंगल शमवण्यासाठी घेतलेला पुढाकार, शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या डान्स बारवर केलेली कारवाई, त्यांनी चालवलेलं समांतर न्यायालय, रक्षाबंधन, नवरात्री, गुरुपौर्णिमा आणि ठाण्यातील राजकारणावर उमटवलेली आपली मोहोर अशा विविध माध्यमातून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास समोर येतो. नवरात्रीच्या गाण्यासोबतच 'भेटला विठ्ठल...' आणि टायटल साँग चांगलं झालं आहे. कॅमेरावर्क, मेकअप, गेटअप, कला दिग्दर्शन सारं काही अगदी पद्धतशीरपणे केलं आहे. टाळ्या-शिट्यांचा वर्षाव करण्यासाठी प्रेक्षकांना पुरेसा वाव आहे.

सकारात्मक बाजू : कथानकाला गीत-संगीताची सुरेख साथ लाभली असून कलाकारांचा अभिनयही मनाला भिडतो. काही दृश्ये प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करतील.

नकारात्मक बाजू : क्लायमॅक्सपूर्वी रुग्णालयात असलेल्या दिघेंना जेव्हा काही राजकीय व्यक्तिमत्त्वं भेटायला येतात त्यांच्या निवडीकडं विशेष लक्ष दिलेलं नाही. त्या व्यक्तिरेखा सिनेमाचा रंग भंग करतात.

कलाकारांचा अभिनय :
आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत. देहबोली, संवादफेक आणि इतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टींवर प्रसादनं अत्यंत बारकाईनं काम केलं आहे. गश्मीर महाजनीनं रिक्षावाला आणि श्रुती मराठेनं पत्रकार चांगल्या प्रकारे साकारली आहे. क्षितीज दातेनं एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. स्नेहल तरडे, विजय निकम, विघ्नेश जोशी, अभिजित खांडकेकर, अंशुमन विचारे, जयवंत वाडकर या सर्वानीच चांगलं काम केलं आहे.

थोडक्यात... 
आनंद दिघे यांचा फोटो ठाण्यातील काही घरांतील देव्हाऱ्यामध्ये का आहे हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा.

Web Title: Dharmaveer Mukkam Post Thane Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app