या तारखेला उडणार 'दादाच्या लग्नाचा' बार !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:30 AM2020-01-10T06:30:00+5:302020-01-10T06:30:00+5:30

'विकून टाक' ह्या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे.

Dadacha Lagin Vikun Taak Marathi Movie | या तारखेला उडणार 'दादाच्या लग्नाचा' बार !

या तारखेला उडणार 'दादाच्या लग्नाचा' बार !

googlenewsNext

'विकून टाक' हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील 'माझ्या दादाचे लगीन' हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी 'विकून टाक' सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहले आहे. लग्न म्हटले की मौजमजा, नाचगाणे ओघाने येतेच. त्यात जर लग्न खेड्यात असेल तर तिथली मजा काही औरच. मुकुंदाच्या म्हणजेच शिवराजच्या लग्नातले हे गाणे अतिशय सुंदर आहे. 

बहिणीपासून ते काकापर्यंत प्रत्येक जण मुकुंद सोबत असलेले आपले नाते सांगत त्याच्या लग्नाचा आनंद व्यक्त करत आहेत. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला नंदेश उमप यांच्या भारदस्त आवाजाने चारचाँद लागले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले आहे. या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचे निर्माते उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी 'आमच्या दादाचे लगीन' म्हणत नृत्याची झलक दाखवली आहे. 
      
या गाण्याचा जन्म कसा झाला, याबद्दलचा एक किस्सा संगीतकार अमितराज यांनी सांगितला, ''आम्हाला एक हळदीचे गाणे बनवायचे होते. अनेक दिवस त्याच्यावर काम सुरु होते, मात्र काही जुळून येत नव्हते. एकदा आमच्या टीममधला एक सहकारी माझ्या 'भावाचे लगीन' आहे म्हणून लवकर जायचे सांगून निघाला. त्या क्षणी आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली, प्रत्येक नात्याचा वापर करून आपण गाण्याची जुळवाजुळव केली तर? आणि त्या दृष्टीने गाणे बनवायचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमने केला. त्यातूनच मग 'माझ्या दादाचे लगीन' गाण्याचा जन्म झाला. ज्यावेळी आम्ही हा प्रयोग केला तेव्हा वाटलेही नव्हते, की हे गाणे इतके धमाकेदार होईल.''
        
'विकून टाक' ह्या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. 

Web Title: Dadacha Lagin Vikun Taak Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.