भार्गवी चिरमुले दिसणार लवकरच या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 02:25 PM2019-08-17T14:25:30+5:302019-08-17T15:06:49+5:30

खाकी वर्दी चढविली की पोलिसाने नाती-गोती आणि वैयक्तिक मते विसरून निःपक्षपाती काम केले पाहिजे, अशी रास्त अपेक्षा पोलिसांकडून आहे.

Bhargavi chirmule will seen in marathi movie lalabatti | भार्गवी चिरमुले दिसणार लवकरच या सिनेमात

भार्गवी चिरमुले दिसणार लवकरच या सिनेमात

googlenewsNext

खाकी वर्दी चढविली की पोलिसाने नाती-गोती आणि वैयक्तिक मते विसरून निःपक्षपाती काम केले पाहिजे, अशी रास्त अपेक्षा पोलिसांकडून आहे. रस्त्यावर दिसणारा खाकी वर्दीतला पोलीस आपल्या संरक्षणासाठी राबत असतो. मात्र आपण त्याच्या मधल्या ‘माणसा’चा विचार कधी करतो का? त्याच्या सुखदु:खाबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं?  हीच मध्यवर्ती कथा घेऊन महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ मध्ये (क्यूआरटी) घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित असलेला ‘लालबत्ती’ हा मराठी चित्रपट २३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साई सिनेमा’ या चित्रपट निर्मिती संस्थेची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे.

२६ /११ च्या भीषण अतिरेकी हल्ल्याने अवघी मुंबई  हादरून गेली. अशा संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी एका प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज पथकाची गरज होती. या सगळ्यासाठी ‘क्यूआरटी’ हे योग्य उत्तर होते. म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात ‘क्यूआरटी’ म्हणजेच ‘क्विक रिस्पोन्स टीम’ स्थापण्यात आल्या. ठाणे ‘क्यूआरटी’ मध्ये घडलेल्या घटनेवर ‘लालबत्ती’ चित्रपट आधारित आहे. तडफदार पोलीस ऑफिसर एस.बी पवार आणि जिगरबाज कमांडो गणेश यांची ही गोष्ट आहे.    

ज्येष्ठ पोलिस अधिकारी एस.बी.पवार आणि त्यांच्या हाताखाली ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ मध्ये (क्यूआरटी) असणारा कमांडो गणेश, यांच्यातल्या नातेसंबधाची कथा दाखवताना पोलिसांच्या जीवनातील विविध पैलू त्यांना करावं लागणारे खडतर ट्रेनिंग याचा परामर्श हा चित्रपट घेतो. या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला अविनाश-विश्वजीत यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. जिगरबाज पोलिसांची कहाणी उलगडणारा ‘लाल बत्ती’  चित्रपट आपल्या रक्षणकर्त्यांना दिलेली मानवंदना आहे. 

Web Title: Bhargavi chirmule will seen in marathi movie lalabatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.