ठळक मुद्देआज स्मिताताई पाटील यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी महोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग... ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईने माझे अस्तु मधले काम पाहून मला दिली होती

अमृता सुभाषने नुकतीच मामी फेस्टिव्हमध्ये घातलेल्या एका ओढणीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ही ओढणी दुसरी कुणाची नसून स्मिता पाटील यांची आहे. स्मिता पाटील यांची ओढणी अमृताकडे कशी आली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना... तर याचे उत्तर अमृतानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना दिले आहे.

अमृताने इन्स्टाग्रामवर मामी फेस्टिव्हमधील तिचा फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, आज स्मिताताई पाटील यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी महोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग... ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईने माझे अस्तु मधले काम पाहून मला दिली होती आणि सांगितलं होतं, तू जेव्हा या क्षेत्रात काम करणं थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल... ही भेट माझ्यासाठी अमूल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण काढत तिची ही ओढणी घेतली. तिच्यासारखं मोठं कुंकू लावून झुमके घालून या समारंभाला पोहचले. कार्यक्रम सुरू झाला आणि एक विलक्षण गोष्ट घडली. त्या बंद ऑडिटोरियममध्ये झगमगत्या दिव्यात एक सुंदर फुलपाखरू आलं. प्रेक्षकात उडायला लागलं. अनेकांना त्या ठिकाणी ते फुलपाखरू पाहून आश्चर्य वाटलं. थोडा वेळ उडून ते निघून गेलं. काहीच वेळात दीपिका पादुकोण आणि विशालजी भारद्वाजांनी दिप्ती नवल यांना पुरस्कार दिला. त्यावेळी दिप्तीदींच्या कामावर आधारित व्हिडीओ सुरू झाला आणि एका अवचित क्षणी स्मितादी आणि दिप्तीदिंचा फोटो पडद्यावर झळकला. माझे डोळे भरून आले.

हा फोटो अमृताच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोवर ते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. ही ओढणी तुला मिळाली ही योग्यच गोष्ट आहे. तू त्या योग्यतेची असल्याचे तिच्या फॅन्सने तिला प्रतिक्रियांच्या मार्फत म्हटले आहे. 


Web Title: Amruta Subhash has wear Smita patil chunari in mami film festival 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.