Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 11:24 IST2024-12-07T11:24:10+5:302024-12-07T11:24:53+5:30

भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Why does BJP want home affairs cm Devendra Fadnavis told the reason to eknath shinde shiv sena | Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक निकालात भाजपला विक्रमी १३२ जागांवर विजय मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्याचं मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला गेले. मात्र मुख्यमंत्रि‍पदाच्या बदल्यात आम्हाला गृह आणि महसूलसारखी महत्त्वाची खाती मिळावीत, यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला नेमकी कोणकोणती खाती येणार, याबाबत चर्चा रंगत असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"तुम्ही २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यापासून संधी मिळेल तेव्हा तुम्ही गृहखातं तुमच्याकडे ठेवलं आहे, आता एकनाथ शिंदेंचीही गृहखात्याची मागणी आहे. हे खातं तुम्ही सोडणार नाही, हे नक्की आहे का?" असा प्रश्न एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, "गृह विभाग आमच्याकडे असावा, असं आमचं मत आहे.  मागील काही वर्षांत हे खातं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृह मंत्रालयाशीही सतत समन्वय साधावा लागत असतो. कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे. तसं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील केंद्राशी समन्वय साधू शकतात, कारण ते आमचे मित्रपक्षच आहेत. मात्र  मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं, असा आमचा प्रयत्न असतो," असं म्हणत फडणवीस यांनी भाजप गृहखातं सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, अद्याप खातेवाटपाविषयी निर्णय झाला नसून आमची चर्चा सुरू आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आधी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि नंतर त्याबदल्यात गृह आणि महसूलसारख्या महत्त्वाच्या खात्यांची मागणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खातेवाटपाबाबत भाजपकडून कसे समाधान केले जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कधी होणार खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार?

मंत्रिमंडळाच्या विस्तारात विभागीय आणि जातीय संतुलन साधण्याचा महायुतीतील तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. जुन्या मंत्र्यांचा पत्ता सरसकट कापला जाणार नाही. मात्र, काही चेहरे वगळले जातील. भाजपला २० ते २२, शिंदेसेनेला १२ ते १३ आणि अजित पवार गटाला ९ ते १० मंत्रिपदे दिली जातील, अशी शक्यता आहे. विस्तारात कोणाकोणाचे समाधान करायचे हा प्रश्न तिन्ही पक्षांसमोर असेल. महायुतीचे २०२२ मध्ये सरकार आले तेव्हापासून मंत्रिपदाची वाट पाहत असलेल्या शिंदेसेनेतील आमदारांना यावेळी संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. भाजपचा विचार करता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे महत्त्वाचे असेल. १३२ आमदार असलेल्या भाजपमध्ये मंत्रिपदे देताना पक्षनेतृत्व आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.


 

Read in English

Web Title: Why does BJP want home affairs cm Devendra Fadnavis told the reason to eknath shinde shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.