चंद्रपुरात सत्ता कुणाची, सस्पेन्स वाढला; उद्धवसेना तटस्थ राहिल्यास गणित कोलमडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 07:23 IST2026-02-10T07:22:29+5:302026-02-10T07:23:07+5:30
भाजपचा व्हीप, काँग्रेसची धावपळ, महापौरपदासाठी उद्धवसेना ठाम

चंद्रपुरात सत्ता कुणाची, सस्पेन्स वाढला; उद्धवसेना तटस्थ राहिल्यास गणित कोलमडणार?
चंद्रपूर - महापौरपदासाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीआधीच भाजपाने उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी सोमवारी व्हिप जारी केला. त्याचवेळी काँग्रेसकडून उद्धवसेनेला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू असून, उद्धवसेना महापौरपदावर ठाम आहे.
उद्धवसेना तटस्थ राहिल्यास गणित कोलमडणार?
उद्धवसेनेचा दावा आहे की स्वतःचे ६, वंचितचे २ आणि २ अपक्ष असे १० नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत. एमआयएमचा १ नगरसेवक साथ देऊ शकतो. म्हणजेच एकूण ११. मात्र एवढ्या संख्येवर महापौरपद मिळवणे अशक्यप्राय मानले जात आहे.
इचलकरंजी, जालन्याचे पहिले महापौर भाजपचे, बिनविरोध झाली निवड
इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंदा धातुंडे यांची, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल देवकरण डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. शिव-शाहू विकास आघाडीने दोन्ही पदांसाठीची उमेदवारी मागे घेतली. महानगरपालिका सभागृहामध्ये भाजप महायुतीकडे ४७ सदस्य, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडे १७ व उद्धवसेनेचा १ नगरसेवक होता. निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली होती.
लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर
लातूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा पेच अखेर सुटला असून, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौरपदी, तर ॲड. स्नेहल उटगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार मागे घेतल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसचे ४३ आणि वंचितचे ४ उमेदवार निवडून आल्याने या युतीचे सभागृहात स्पष्ट बहुमत होते. मात्र, सत्तेत योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘वंचित’ने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले.
वंदना मगरे जालनाच्या पहिल्या महापौर
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून भाजपच्या वंदना मगरे, तर उपमहापौर म्हणून राजेश राऊत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
पुण्याच्या महापौरपदी नागपुरे; वाडेकर उपमहापौर
पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि उपमहापौरपदी ‘रिपाइं’चे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्याने भाजप कोणत्या नगरसेविकेला महापौरपदावर संधी देणार याबाबत उत्सुकता होती. नागपुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या आहेत.