'तुम्ही काय करता आहात?'; उद्धव ठाकरेंनी सावरकर, नेहरूंवरून काँग्रेस-भाजपला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:06 IST2024-12-17T16:06:34+5:302024-12-17T16:06:34+5:30
Uddhav Thackeray on BJP and Congress: सावरकर आणि नेहरूंचे नाव घेत काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सातत्याने एकमेकांना लक्ष्य करतात. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांना खडेबोल सुनावले.

'तुम्ही काय करता आहात?'; उद्धव ठाकरेंनी सावरकर, नेहरूंवरून काँग्रेस-भाजपला सुनावलं
Uddhav Thackeray Latest News: 'सावरकर आणि नेहरूंबद्दल बोलणं काँग्रेस आणि भाजपने बंद करावं', असे म्हणत शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षाना खडेबोल सुनावले. काँग्रेसकडून सावरकरांवर केल्या जाणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. सावरकरांवर काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या टीकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
जे करायचं, ते करून गेले; तुम्ही काय करता आहात?
उद्धव ठाकरे म्हणाले, "मला एक गोष्ट अशी वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष, यांनी आता सावरकर... सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू... नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. कारण आताचा हा जो काळ आहे, तो काळ आपल्याकडे बघतोय की, त्यावेळी त्यांनी जे काय करायचं, ते करून गेले. तुम्ही काय करता आहात?"
मोदींनीही नेहरूंचं रडगाणं बंद करावं -उद्धव ठाकरे
या मुद्द्यावर पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, "अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं बंद करावं आणि काँग्रेसने सुद्धा सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं. कारण दोघेही आपापल्या जागी होते. आपण काय करणार आहोत, हे आता लोकांना दाखवावं. मूळात सावरकरांना भाजपने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? का देत नाहीत? त्यांना भारतरत्न द्या", अशी मागणी ठाकरेंनी केली.
"देवेंद्र फडणवीस मागे मुख्यमंत्री होते, तेव्हा दोन-तीन वेळा पत्र दिले. त्या पत्र दिले. ते पत्र केराच्या टोपलीत गेले. मोदीच होते ना पंतप्रधान? अगदी तारखांसह पत्र माझ्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, आताचेही तेच आहेत, पण त्यावेळी केलेली विनंती अद्याप भाजपचे वरिष्ठ नेते मानत नसतील, तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही", असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.