उद्धव ठाकरेंची मविआकडून लढण्याची ऑफर, नितीन गडकरींचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले.…
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:12 IST2024-03-13T16:11:41+5:302024-03-13T16:12:13+5:30
Nitin Gadkari News: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्याला आता नितीन गडकरी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंची मविआकडून लढण्याची ऑफर, नितीन गडकरींचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले.…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. एकीकडे महाविकासा आघाडीतील नेते भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांवर घणाघाती टीका करत आहेत. मात्र याला नितीन गडकरी अपवाद ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्याला आता नितीन गडकरी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेली ऑफर हास्यास्पद आणि अपरिपक्वतापूर्ण असल्याचा टोला नितीन गडकरी यांनी लगवला आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर घणाघाती टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिल्ली आणि मोदींसमोर न झुकण्याचं आवाहन केलं होतं. मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे ते दाखवून द्या, राजीनामा द्या आणि महाविकास आघाडीकडून लढा. लवकरच आमचं सरकार येणार आहे, त्यात आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ, अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली होती.
या ऑफरवर प्रत्युत्तर देताना नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेली ऑफर ही हास्यास्पद आणि अपरिपक्वतापूर्ण असल्याचा टोला लगावला. भाजपामध्ये निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याची एक व्यवस्था आहे. शिवसेना ठाकरे गटाला भाजपाच्या नेत्यांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोलाही गडकरी यांनी लगावला.
दरम्यान, भाजपा आणि महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र आज संध्याकाळी भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील काही प्रमुख लोकसभा मतदारसंघातील भाजपा नेत्यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.