“नितीन गडकरीजी, भाजपाचा राजीनामा द्या अन् मविआमध्ये या; आम्ही निवडून आणू”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 22:41 IST2024-03-07T22:40:47+5:302024-03-07T22:41:46+5:30
Uddhav Thackeray News: हो मला आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

“नितीन गडकरीजी, भाजपाचा राजीनामा द्या अन् मविआमध्ये या; आम्ही निवडून आणू”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray News: काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते. पण नितीन गडकरी यांचे नाव नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, अशी खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यातील विविध भागांत दौरे करत आहेत. कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. धाराशीव येथील एका मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा, केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. निवडणुका आल्यावर सबका साथ, मेरा परिवार आणि निवडणूक झाल्या की मेरा दोस्त. त्यांच्या मतलबासाठी भाई और बहनो. मतलब पूर्ण झाले की तुमच्याकडे बघत पण नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
हो मला करायचे आदित्यला मुख्यमंत्री आहे
हो मला आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचे आहे. पण त्यासाठी त्याला तुम्ही निवडून दिले पाहिजे. जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातील त्यांच्यासोबत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, २५ वर्ष तुमच्यासोबत राहून मी शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही. तर मग शिवसेनेची काँग्रेस कशी होऊ देणार? ही निवडणूक झाल्यावर भाजपा पुन्हा सत्तेत आली तर लोकशाहीचा मुडदा पडेल. त्यामुळे तुम्हाला लोकशाहीचा मुडदा पडणारे व्हायचे आहे की नाही हे ठरवायचे आहे. अब की बार, भाजपा तडीपार. आज भाजपला तडीपारीची नोटीस देतोय. त्यावर तुम्ही जनता सही करणार की नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.