एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 06:37 IST2026-01-08T06:34:31+5:302026-01-08T06:37:31+5:30
‘आपले ठाणे आपला देवाभाऊ’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली.

एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते व शिवसेनेला राजकीय ओळख प्राप्त करून देणारे शहर ठाणे हेच आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिंदे यांची ओळख ही ठाणेच असल्याने त्यांना न दुखावण्याकरिता भाजपने महापालिका निवडणुकीत युती केली, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. युती करताना जागावाटप अथवा राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवला नाही. शहराची ओळख, स्थैर्य आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याकरिताच युती केली, असे ते म्हणाले.
‘आपले ठाणे आपला देवाभाऊ’ या कार्यक्रमात फडणवीस यांची मुलाखत अभिनेत्री तेजश्री प्रधान व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी घेतली. फडणवीस म्हणाले की, स्वत:चे अधिक नगरसेवक विजयी करण्याच्या संकुचित विचारापेक्षा मुंबई महानगर प्रदेशात जेथे जेथे शक्य असेल तेथे स्थिर आणि सक्षम युती देण्याचे काम केले. मी व एकनाथ शिंदे इतके मजबूत आहोत की कुणीही ब्रँड म्हणून उभे राहिले तरी आम्ही दोघे त्यांचा बँड वाजवू.
जास्त मतदानाने लोकप्रतिनिधी उत्तरदायी
काही नगरसेवक निवडून आल्यानंतर त्या विभागाचे आपण जणू मालक असल्यासारखे वागतात. सुई एवढे कामसुद्धा स्वत:च्या मर्जीखेरीज होऊ देत नाही. ही प्रवृत्ती अत्यंत घातक असून त्यांनी सेवाभावी वृत्ती अंगीकारावी, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. कमी मतदानाचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी स्वत:हून मतदानाला बाहेर पडले पाहिजे. जेणेकरून लोकप्रतिनिधींवर दडपण येईल आणि ते अधिकाधिक मतदारांना उत्तरदायी होतील.
ठाण्याकरिता आता पोशीर, शिलार योजना
ठाण्यासाठी काळू प्रकल्पातील अडचणी दूर केल्या असून काळू धरण पूर्ण होण्यापूर्वी पोशीर आणि शिलार या दोन प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाची पुढील ३० वर्षांची तहान भागवली जाणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. गारगाई प्रकल्प सुयोग्य होता. मात्र, वन विभाग परवानगी देत नव्हता. पाच गावांमुळे प्रकल्पात अडथळा होता. आता ही गावे स्थलांतराकरिता तयार असल्याने अतिरिक्त पाणी मिळेल असे ते म्हणाले.