खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:58 IST2024-12-05T12:54:52+5:302024-12-05T12:58:45+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

खोटारडेपणा, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला थारा नाही; शपथविधीपूर्वी बावनकुळेंचा हल्लाबोल
BJP Chandrashekhar Bawankule ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आज महायुतीचे सरकार स्थापन होत असून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. अन्य मंत्र्यांचा शपथविधी आज होणार की त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहावी लागणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. शपथविधीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केलेलं असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
"भारतीय जनता पार्टीसह महायुतीला या राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे. ही निवडणूक व त्यातून जनतेने दिलेला कौल इतर अनेक निवडणुकांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा आहे. जनादेश स्पष्ट आहे की, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रभूमीत खोटारडेपणाला, संधीसाधू वृत्तीला, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला अजिबात थारा नाही," अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.
दरम्यान, "महायुती सरकारच्या आजच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे प्रमुख नेते, संत - महंत, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्या माय - बाप जनतेने आजचा दिवस महायुतीच्या आयुष्यात आणला ती माय-बाप जनता महायुती सरकारला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणार आहे. महायुती सरकारला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व जनतेचे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो," असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महायुतीचे समर्थक मुंबईत दाखल
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून महायुतीचे हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मंत्रालय परिसरात असलेली भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाची कार्यालये गजबजून गेली होती. सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत. इतर मंत्र्यांचा शपथविधी याच सोहळ्यात होणार का याबाबत संभ्रम आहे. तरीही आपल्या नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश होईल या आशेने अनेक नेत्यांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीकडून मंत्रालय आणि आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.