कोणतीच अडचण नाही, सत्ता लवकरच स्थापन होईल; शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भूमिका
By मनोज मुळ्ये | Updated: November 30, 2024 18:14 IST2024-11-30T18:13:16+5:302024-11-30T18:14:49+5:30
२०१९ मध्ये तर ३६ दिवस लागले

कोणतीच अडचण नाही, सत्ता लवकरच स्थापन होईल; शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भूमिका
रत्नागिरी : सत्ता स्थापनेबाबत काेणीही काहीही विधाने करत असले तरी त्यात तथ्य नाही. सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अडचण नाही. नजीकच्या तीन -चार दिवसांत सत्ता स्थापन होईल, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये महायुतीच्या चर्चेप्रसंगी मीही हजर होतो. ही चर्चा सकारात्मक झाली. या चर्चेत काय झाले हे त्याच रात्री दीड-दोन वाजता एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेतही मी सविस्तर बोललो होतो. आपली भूमिका एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निर्णय घ्यायचा आहे. जो काही निर्णय घेतील, त्याला शिंदेसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आम्हाला किती जागा हव्या आहेत, याबाबत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय होऊन लवकरच सत्ता स्थापन होईल याची आपल्याला खात्री आहे, असे सामंत यांनी सांगितले.
२००४ पासून प्रत्येकीवेळी सत्ता स्थापन होण्यास वेळ लागला होता. २०१९ मध्ये तर ३६ दिवस लागले. पण त्यावर कोण चर्चा करत नाही. कोणीतरी सकाळी पत्रकार परिषद घेऊन बोलतो आणि त्याबाबत चर्चा केली जाते. निकाल लागून पाच-सहा दिवसच झाले आहेत. जास्त वेळ लागणार नाही. दोन दिवसात सर्व गोष्टी निश्चित होतील, असे ते म्हणाले.
भाजपच्या नेता निवडीनंतर लगेचच..
भाजपची विधिमंडळ पक्षनेत्याची निवड बाकी आहे. ही निवड झाल्यानंतर लगेचच महायुतीची सत्ता स्थापन होईल, असेही सामंत यांनी सांगितले.