Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:16 IST2024-12-10T14:13:58+5:302024-12-10T14:16:23+5:30
Maharashtra Cabinet Expansion News : सरकार स्थापन केल्यानंतर महायुतीत सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत.

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?
Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सरकार स्थापन केले. आता सध्या खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा सुरू असून, अधिवेशनाआधी म्हणजे १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. आजतकने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात काही मोठ्या नेत्यांचा समावेश केला जाणार नाही. गेल्या सरकारमध्ये काही कॅबिनेट मंत्र्यांची कामगिरी वाईट राहिली. त्यामुळे सरकारवर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली, असे सूत्रांनी सांगितले.
नव्या चेहऱ्यांना संधी?
मागच्या सरकारमधील काही नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याबद्दल तिन्ही पक्षाचे एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काही नवी आणि चांगली प्रतिमा असलेल्या आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांना बाहेर ठेवण्याबद्दल जोर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला?
महायुतीत तीन प्रमुख पक्ष आहेत. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्रांच्या समावेश असेल. भाजपकडून १५, शिवसेनेकडून १०, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सूत्रांनी सांगितले.