ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:19 IST2024-12-16T09:11:21+5:302024-12-16T09:19:17+5:30

रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुती सरकारच्या ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.

Some ministers in the cabinet of the Mahayuti government are facing investigations central investigative agencies | ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा

ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा

Maharashtra Cabinet Expansion: नागपूरच्या राजभवनात रविवारी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळात अशा अनेक नावांचा समावेश ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, कोणावरही आरोपपत्र दाखल झालेले नाही. 

रविवारी झालेल्या विस्तारात महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात सामिल झालेले अनेक नेते अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. यात प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. पण या मंत्र्याविरुद्धचा तपास पूर्ण झाल्याचे सांगणारा कोणताही क्लोजर रिपोर्ट कोर्टात दाखल करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टद्वारे मंजुरी मिळाल्यानंतर भाजपचे गिरीश महाजन हे मंत्रिमंडळात सामील झाले आहेत.

धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंगचा आरोप केला तेव्हा ते विरोधी पक्षात होते. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते सरकारमध्ये सहभागी झाले. या मंत्र्यांविरुद्ध चौकशा सुरू आहेत. तसेच त्यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्याशी कथितरित्या संबंधित काही लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

वृत्तानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्यावर खंडणी आणि अपहरणाचे आरोप होते. ते सीबीआय चौकशीची मागणी करत होते आणि नंतर शिंदे सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. महाजन यांना सीबीआयकडून दिलासा मिळाला आहे. सीबीआयने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके आणि इतरांवर आरोप दाखल केले होते.

दुसरीकडे, मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापे टाकले होते. पुस गावातील १७ एकर भूखंडाबाबत धनंजय मुंडे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. हा भूखंड यापूर्वी बेलखंडी मठाच्या पुजाऱ्याला भेट म्हणून देण्यात आला होता. २०१२ मध्ये मुंडे यांनी पुजाऱ्याच्या वारसांकडून तो विकत घेतला. तर प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध दोन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे.

दरम्यान, शपथ घेतलेल्या ३३ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे १९ शिंदेसेनेचे ११ आणि अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्र्यांमध्ये भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार गटाच्या एकाचा समावेश आहे.
 

Web Title: Some ministers in the cabinet of the Mahayuti government are facing investigations central investigative agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.