अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:48 IST2024-12-15T15:37:41+5:302024-12-15T15:48:33+5:30
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."
Maharashtra Cabinet Expension : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाळाचा विस्तार आज होणार आहे. नागपूरच्या राजभवनमध्ये दुपारी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. यामध्ये ३० ते ३२ मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या याद्या देखील समोर आल्या आहेत. तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना मंत्रीपदाच्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिमंडळात काम करता यावं यासाठी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी योजना आखल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
नागपुरात मंत्रिमंडळ विस्ताराआधी राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी काही मंत्र्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झाली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
"सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात. पण ज्यावेळी आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळी काहींना दीड वर्षाची कारकिर्द मिळाली आहे. या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारणपणे आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी देण्यात येणार आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी," असं अजित पवार यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे
दरम्यान, अजित पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे म्हटलं जात आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम या जुन्या मंत्र्यांना संधी मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार यांच्यासोबत नागपुरातील कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र छगन भुजबळांची या कार्यक्रमाला उपस्थिती नसल्याने ते नाराज आहेत का असा सवाल विचारला जात आहे.