शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:58 IST2024-12-06T09:57:06+5:302024-12-06T09:58:49+5:30
प्रशासनाकडून कळत नकळत झालेली चूक आहे ती मान्य करावी लागेल असं किरण पावसकर यांनी सांगितले.

शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप
मुंबई - महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या सोहळ्याला लोकांची प्रचंड गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीए घटकपक्षाचे नेते हजर होते. अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी शपथविधीसाठी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्यातील बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज झाल्याचं समोर आलं. शिवसेनेच्या अनेक मुख्य नेते, दिग्गज माजी मंत्र्यांनाही पाठिमागच्या रांगेत बसावं लागलं त्यावरून शिवसेना नेते किरण पावसकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे.
किरण पावसकर म्हणाले की, हा शासनाचा कार्यक्रम होता, पक्षाचा नव्हता. त्यात थोडाफार ढिसाळपणा दिसला. आमचे जे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था मागच्या बाजूला केली होती. तिन्ही पक्षाकडे काही पासेस दिले जातील हे ठरले होते. आमच्या कार्यालयाला जे पास मिळाले ते सगळे १ नंबर गेटचे होते. त्यामुळे अभाव दिसून आला. आमचे पदाधिकारी १ नंबर गेटला गेले त्यानंतर ५ नंबर गेटला आले. आमचे केंद्रीय मंत्री व्यासपीठावर होते पण काही नेते असते तर आणखी बरे वाटलं असते. एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या शिवसैनिकाला वाटत होते माझा नेता त्या व्यासपीठावर का नसावा, हे वाटणं साहजिकच आहे. शिवसैनिकांनी खंत बोलून दाखवली. आमचे पदाधिकारी, वरिष्ठ व्यासपीठावर हवे होते असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रशासनाकडून कळत नकळत झालेली चूक आहे ती मान्य करावी लागेल. शपथविधी सोहळा आज शुभ दिन होता. राज्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिन्ही नेते एकत्रित आहेत. त्यामुळे फार काही यावर बोलणे योग्य राहणार नाही. मात्र प्रशासनाने याची दखल घ्यावी. यापुढे राजशिष्टाचार विभागाकडून या चूका होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे असं शिवसेना नेते किरण पावसकर यांनी म्हटलं.
व्यासपीठावर कोण कोण होते?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासोबतच अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते. त्याशिवाय महायुतीतील भाजपा नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते. शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे मंचावर होते.