“भाकरी खातात ठाकरे गटाची अन् चाकरी करतात शरद पवार गटाची”; शिंदे गटाचा राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:33 IST2024-04-22T15:31:55+5:302024-04-22T15:33:31+5:30
Shiv Sena Shinde Group Dada Bhuse News: संजय राऊतांमुळे शिवसेनेत फूट पडली. हे संपूर्ण देशाचे म्हणणे आहे, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

“भाकरी खातात ठाकरे गटाची अन् चाकरी करतात शरद पवार गटाची”; शिंदे गटाचा राऊतांना टोला
Shiv Sena Shinde Group Dada Bhuse News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच गौप्यस्फोटांच्या मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत सातत्याने महायुती तसेच भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका करत असून, शिवसेना शिंदे गट, भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच ठाकरे गटातील नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. संजय राऊतांमुळे शिवसेनेत फूट पडली. हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे म्हणणे आहे. मी अनेकदा सभागृहामध्येही बोललो की, संजय राऊत हे शरद पवार यांचे पंटर आहेत. ते भाकरी खातात ठाकरे गटाची आणि चाकरी करतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची, या शब्दांत दादा भुसे यांनी खोचक टोला लगावला.
महायुतीचे महाराष्ट्रातील ४५ प्लसचे मिशन आम्ही यशस्वी करु
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक चांगले काम केले आहे. महायुतीचे महाराष्ट्रातील ४५ प्लसचे मिशन आम्ही यशस्वी करु, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. यावर, भाजपाने ईडी आणि सीबीआय मागे लावून एकनाथ शिंदे यांनाच जेलमध्ये टाकायचा प्लॅन केला होता. तेव्हा तुरूंगात जायला लागू नये, म्हणून ते कुठे-कुठे जाऊन रडले, हे तुम्ही त्यांना विचारा. भाजपामध्ये गेल्यावर त्या व्यक्तीला खोटे बोलण्याचे ट्रेनिंग दिले जाते. भाजपामध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटे बोलणाऱ्याला स्थान आहे, असा पलटवार संजय राऊतांनी केला.