गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 19:43 IST2024-12-01T19:35:55+5:302024-12-01T19:43:37+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी (दि.१) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला.

sharad pawar ncp appointment of jitendra awhad as group leader; uttam jankar, rohit patil as pratod information about jayant patil | गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी!

गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड, नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर आमदार उत्तम जानकर आणि आमदार रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी (दि.१) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. त्यानुसार, नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली तर, ज्येष्ठ नेते, आमदार उत्तम जानकर आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधिमंडळाचे नेते बैठकीला उपस्थित नसल्याने विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. हिवाळी अधिवेशनाच्या काळात या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

आज झालेल्या बैठकीत विधिमंडळातील १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. संदीप शिरसागर यांच्या मतदारसंघात त्यांच्या सत्कार कार्यक्रम असल्याने या बैठकीला अनुपस्थित राहण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, संदीप शिरसागर उद्या येऊन आज मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसेच, आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतदान कसे वाढले, याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. फॉर्म १७ आणि मतांची आकडेवारी जुळत नसेल तर हे फार गंभीर आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ ४९ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. त्यामध्ये, २० जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने १७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे.

Web Title: sharad pawar ncp appointment of jitendra awhad as group leader; uttam jankar, rohit patil as pratod information about jayant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.