सांगली: काँग्रेसच्या विशाल पाटलांना ठाकरेंकडून राज्यसभेची ऑफर? संजय राऊतांचे जागेच्या तिढ्यावर संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:45 IST2024-04-05T11:45:01+5:302024-04-05T11:45:54+5:30
Sanjay Raut on Sangali Vishal Patil: विशाल पाटलांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता असून मैत्रिपूर्ण लढत करू, असे त्यांचे स्थानिक नेते म्हणत आहेत.

सांगली: काँग्रेसच्या विशाल पाटलांना ठाकरेंकडून राज्यसभेची ऑफर? संजय राऊतांचे जागेच्या तिढ्यावर संकेत
उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून बिनसले आहे. ठाकरे गटाने काँग्रेसला दोन जागा सोडल्या आहेत, परंतु काँग्रेस काही केल्या ठाकरेंसाठी दोन जागा सोडायला तयार नाहीय. यातच ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे विशाल पाटलांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता असून मैत्रिपूर्ण लढत करू, असे त्यांचे स्थानिक नेते म्हणत आहेत. यातच संजय राऊत यांचे विशाल पाटलांना संसदेत पाठविण्याबाबतचे वक्तव्य आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलो आहे. वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवे. कोणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही. सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागले आहेत. आज, उद्या आणि परवा मी देखील त्या भागात जाणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
सांगली मतदारसंघातील काँग्रेसच्या तिढ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते, तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. रामटेक हा आमचा परंपरागत मतदारसंघ आहे. आमच्या शिवसैनिकांना वाटत होते की, तो मतदारसंघ आमच्याकडे असावा. पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदारसंघ काँग्रेसला दिला. छत्रपती शाहू महाराजांचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. तिथेही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. आघाडीमध्ये काम करत असताना दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते. सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे. पण लोकसभा निवडणूक सांगलीत हे शिवसेनाच लढणार आहे. विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेणार आहे, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांच्या वक्तव्यामुळे विशाल पाटलांना मविआच्या कोट्यातून संसदेत म्हणजेच राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा काँग्रेससोबत झाल्याचे तर्क लढविले जात आहेत.