“शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण शिंदे गट...”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:52 AM2024-04-01T10:52:20+5:302024-04-01T10:56:21+5:30

Ramdas Athawale News: देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. परंतु, तसे घडले नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

ramdas athawale said bjp devendra fadnavis ready to give us shirdi lok sabha seat but cm eknath shinde group have problem | “शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण शिंदे गट...”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

“शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण शिंदे गट...”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

Ramdas Athawale News: माझ्या नावात आहे राम, तरी माझे आहे बौद्ध धर्माचे काम, अशा ओळी म्हणत, आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. सर्वधर्मसमभावाची आमची भूमिका आहे. अखंड भारताची कल्पना पुढे नेली पाहिजे, असे सांगत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे जागावाटप, उमेदवारी मिळण्याबाबतच्या मावळलेल्या आशा आणि मित्रपक्ष म्हणून असलेली भूमिका यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली. काय ठरले की ठरले नाही, हे गुलदस्त्यातच आहे. तसेच मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत अद्यापही चर्चा होताना दिसत आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकतरी जागा मिळावी, असा आग्रह धरला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात रामदास आठवले यांनी मोठे विधान केले.

शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण...

शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून माझा पराभव झाला होता. या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने उमेदवारी मिळाली नाही, असे रामदास आठवले म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही. असे असले तरी देवेंद्र फडणवीसांनी काही आश्वासने दिली आहेत, असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, या देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही. संविधान बदलणार या फक्त अफवा पसरवल्या जातात. मी मंत्रिमंडळात आहे, संविधानाला हात लावू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत, मागच्या दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे पूर्ण केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील स्मारकासाठी १२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.


 

Web Title: ramdas athawale said bjp devendra fadnavis ready to give us shirdi lok sabha seat but cm eknath shinde group have problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.