“साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा”; कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, शरद पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 20:11 IST2024-03-21T20:09:21+5:302024-03-21T20:11:13+5:30
NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते.

“साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा”; कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, शरद पवार म्हणाले...
NCP Sharad Pawar News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे, बैठका यांचे प्रमाण वाढले आहे. जागावाटप आणि उमेदवारी यांवरून अजूनही खल केला जात आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत असून, जागावाटपावर चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना साताऱ्यातून निवडणूक लढवण्याची आग्रही मागणी केल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवारांनी बंडखोरी करत वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा अधिक जोमाने सक्रीय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका शरद पवार घेत आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशीही शरद पवार चर्चा करत आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा सातारच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, 'साहेब तुम्हीच साताऱ्यातून लढा'. कार्यकर्त्यांच्या या आग्रही मागणीवर शरद पवार यांनी केवळ स्मितहास्य केले. त्यामुळे आता साताऱ्यात शरद पवार नेमकी काय खेळी करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याविषयी आग्रह
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर मीडियाशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे म्हटले होते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील विजयी झाले होते.