ncp likely to give tough fight to udayanraje bhosale shivendraraje bhosale in satara predicts exit poll | Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

सातारा: विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान झालं. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल, अशी आकडेवारी सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधून समोर आली आहे. न्यूज18 आणि आयपीएसओएसनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला तब्बल 243 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर गेल्या निवडणुकीत स्वतंत्र लढूनही प्रत्येकी 40 जागा जिंकणारे काँग्रेस, राष्ट्रवादी यंदा एकत्र लढूनही 50 चा आकडा गाठू शकणार नाहीत, अशी एक्झिट पोलमधील आकडेवारी सांगते. 

न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम महाराष्ट्राशिवाय इतर कोणत्याही विभागात महाआघाडीला दुहेरी आकडा गाठता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र या भागातील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भक्कम किल्ल्याला खिंडार पडलं. त्यातच लोकसभा निवडणूक झाल्यावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी भाजपाचं कमळ हाती धरलं. 

विधानसभेसोबतच साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील मतदान झालं. याठिकाणी राष्ट्रवादीनं श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्यासाठी गेल्याच आठवड्यात शरद पवारांनी सभा घेतली. भर पावसात पवारांनी घेतलेल्या सभेची सर्वत्र चर्चा झाली. ही सभा उदयनराजेंना धक्का देणारी ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. लोकसभेला चूक झाली. आता ती सुधारायची आहे, असं आवाहन शरद पवारांनी त्यांच्या सभेत उपस्थितांना केलं होतं. 

शिवेंद्रराजे यांच्याविरोधात राष्ट्रवादीनं दीपक पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. साताऱ्यातील जनता अनेकदा राजघराण्याच्या पाठिशी उभी राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच राज्यात महायुतीची हवा असल्यानं शिवेंद्रराजेंचा विजय सोपा मानला जात होता. मात्र न्यूज18 च्या सर्वेक्षणानुसार या ठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. त्यामुळे साताऱ्यात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ncp likely to give tough fight to udayanraje bhosale shivendraraje bhosale in satara predicts exit poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.