“संसदरत्न मोठा पुरस्कार नाही, खोटे बोलून काय मिळते?”; जय पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 17:40 IST2024-04-22T17:38:16+5:302024-04-22T17:40:47+5:30
NCP Ajit Pawar Group Jay Pawar News: अनेक वर्षे संधी दिली. सुप्रिया सुळेंना खासदार केले. पण जशी कामे व्हायला पाहिजे होती तशी काहीच काम दिसली नाहीत, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

“संसदरत्न मोठा पुरस्कार नाही, खोटे बोलून काय मिळते?”; जय पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
NCP Ajit Pawar Group Jay Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीतराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेवदारी देण्यात आली आहे. पवार कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यातच अजित पवार यांचे पुत्र जय पवार हेही प्रचारात उतरले असून, बैठका, सभा, रॅली यांवर भर देत आहेत.
एका सभेला संबोधित करताना जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. मीडियाचा गैरवापर कसा करायचा हे त्यांना चांगले माहिती आहे. बारामतीमध्ये जैन समाजाच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रियाताई आणि मी एकत्र आलो. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आत्या तुम्ही पहिला नारळ ठेवा. तर त्या म्हणाल्या, नाही… जय तू आधी ठेव. त्यांचे ऐकून नारळ ठेवला आणि डोळे मिटून प्रार्थना करत होतो. त्याच वेळेस माझ्या शेजारी बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील येऊन उभे राहिले. मी प्रार्थना करत असताना सुप्रियाताई म्हणाल्या की, काय जय कसे चालले, मला वाटले त्या मला म्हणाल्या. म्हणून डोळे उघडले आणि त्यांना म्हणालो की, सगळे बर आहे. यावर सुप्रियाताई म्हणाल्या की, मी तुला नाही. मी दुसऱ्या जयशी बोलत होते. नंतर त्यांनीच सर्व व्हिडिओ मीडियाला दिले आणि त्यांना खोटी बातमी करायला लावली. सुप्रिया सुळे यांनी जय पवारची विचारपूस केली, अशी बातमी त्यांनी करायला सांगितली. हे खोटे बोलून त्यांना काय मिळते, असा थेट सवाल जय पवार यांनी केला.
दरम्यान, त्या म्हणतात की, मला संसदरत्न पुरस्कार मिळाला, त्यांना पुरस्कार मिळाला. पण तुमच्या भोर तालुक्याला काय मिळाले? संसदरत्न पुरस्कार हा सरकारचा नाही, हा एका एनजीओमार्फत दिला जातो. त्यामुळे तो असे काही मोठा पुरस्कार नाही. अनेक वर्षे तुम्ही सुप्रियाताईंना संधी दिली होती. त्यांना खासदार बनवलेले होते, पण जशी कामे व्हायला पाहिजे होती तशी काहीच काम दिसली नाहीत, अशी टीका जय पवार यांनी केली.