महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:11 IST2025-12-24T06:10:18+5:302025-12-24T06:11:32+5:30
पत्र परिषदेत ठाकरे बंधू हे युती करूनच लढणार असल्याची ग्वाही देतील पण त्यांच्यापैकी मुंबईसह कुठल्या महापालिकेत कोणत्या जागा लढणार याविषयी सांगणार नाहीत.

महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधुंच्या महापालिका निवडणुकीतील युतीची घोषणा बुधवारी मुंबईत केली जाणार आहे. अखेर हे ‘भाऊबंध’ जाहीर होत असतानाच पुणे महापालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने काका-पुतणे मिलनाचा नवा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातला आहे.
उद्याच्या पत्र परिषदेत ठाकरे बंधू हे युती करूनच लढणार असल्याची ग्वाही देतील पण त्यांच्यापैकी मुंबईसह कुठल्या महापालिकेत कोणत्या
जागा लढणार याविषयी सांगणार नाहीत. त्यासाठी किमान तीनचार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आमच्यात जागावाटपावर कुठेही ताणतणाव, रस्सीखेच नाही. कुणी कुठल्या जागेसाठी अडून बसलेले नाही, असा दावा खा.राऊत यांनी केला. राष्ट्रवादी (शरद पवार)चे आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू असून ते आमच्यासोबत येतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचा विषय सध्या बंद : काँग्रेसचा विषय सध्या बंद असला तरी कटुता न ठेवता मुंबईत लढण्याचा प्रयत्न करू. निकालानंतर एकमेकांना मदत करण्याबाबत चर्चा झाली आहे. निकालानंतर त्यांची मदत लागल्यास घेऊ, असे राऊत म्हणाले.
मुंबईसह अन्य महापालिकांत एकत्र लढणार असल्याचे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे खा.संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले.
दाेन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास उत्सुक; दाेन पावले मागे घेण्याचीही तयारी
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी आपापल्या चिन्हावर पण एकत्र लढण्याचे ठरविले आहे. जागा वाटपासाठी दोन्ही पक्ष दोन पावलं मागे घेण्यास तयार आहेत. २५ डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीची जाहीर होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पश्चिम विभागाचे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले. दोन गट एकत्र येण्याला राष्ट्रवादीचे
(शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचा आग्रह
धरला आहे.
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी आघाडीबाबत आमची चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसनेही बरोबर यावे अशी आमची इच्छा आहे. पुण्यात अजित पवारांकडील काही पदाधिकारी आणि आमच्याकडील काही पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. अधिकृत प्रस्तावही त्यांच्याकडून आलेला नाही.
खा.सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेत्या.
पुणे, पिंपरी-चिंचवडला घेतलेल्या बैठकांत अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याशी आघाडीचा आग्रह धरला होता.
आ.शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
(शरद पवार)