Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:18 IST2026-01-12T16:16:59+5:302026-01-12T16:18:03+5:30
Maharashtra Dry Day Municipal Election 2026: निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता राखण्यासाठी घेतला निर्णय

Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
Dry Day in Mumbai, Pune and 27 Cities in Maharashtra: राज्यात २९ महापालिका क्षेत्रात येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मुंबईत भाजप विरूद्ध ठाकरे बंधू, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. अशातच निवडणूक आयोगदेखील सर्वप्रकारच्या गोष्टींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार १३ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांकडून कुठलीही आमिष दिले जाऊ नये या हेतुने राज्यात १३ ते १६ जानेवारी या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत, तिथे ड्राय डे लागू करण्यात आला आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात ड्राय डे असणार आहे. जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात २९ महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस या महानगरपालिकांच्या हद्दीत ड्राय डे लागू असेल.
राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मद्यपानाला बंदी घातल्याने मतदानावेळी मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल. निवडणूकसंबंधी गैरप्रकार, गोंधळ, दंगल टाळता येईल. तसेच मतदारांना आमिष म्हणून मद्य देण्याच्या घटनाही घडल्याचे दिसून आले होते. तसे प्रकार टाळण्यासाठी या चार दिवसांत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात दुकानदारांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे.