जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे मनसे पेढे वाटणार; अविनाश जाधवांनी सांगितले रत्नागिरीतून स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:44 IST2024-04-19T18:44:03+5:302024-04-19T18:44:32+5:30
Avinash Jadhav: किती वर्षे जुन्या आठवणीत जगायचे. त्यांनी आश्वासन दिली आहेत, जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे जाधव म्हणाले.

जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे मनसे पेढे वाटणार; अविनाश जाधवांनी सांगितले रत्नागिरीतून स्वप्न
मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. आज नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये अर्ज भरला आहे. यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव उपस्थित होते. यावेळी जाधवांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपावी असे आमचे स्वप्न आहे. जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे तिथे मनसे पेढे वाटणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
राणे यांचा विजय निश्चित आहे. आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून राणेंसाठी काम करणार आहेत. ज्या काही गोष्टी झाल्या आहेत, त्या विसरून, पुढे जायचे आम्ही ठरवलेले आहे. किती वर्षे जुन्या आठवणीत जगायचे. त्यांनी आश्वासन दिली आहेत, जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे जाधव म्हणाले.
महाराष्ट्र सैनिकांचा विचार करून राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असेल. पक्ष आदेशावर जगणारी आम्ही माणसे आहोत. वैभव खेडेकर यांचे नाव आमदारकीसाठी का नाही येऊ शकत? असा सवाल करत आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. खेड-दापोलीत काही लोकांचा मतप्रवाह वेगळा होता. रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे काम वैभव खेडेकर करणार आहेत, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
भास्कर जाधव काय बडबडतात ते त्यांचे त्यांना तरी कळते का, तुमच्या नादाला आम्ही लागत नाही, त्यामुळे आमच्या वाटेला जाऊ नका, आमच्या नादाला लागू नका. तुमच्या बैठकांमध्ये येऊन तमाशा करू. संपलेल्या पक्षाचा हा पुढारी तुमच्या पक्षाची ही परिस्थिती का आली, हे भास्कर जाधव यांनी एकदा पहावे असा इशारा जाधव यांनी दिला. भास्कर जाधव यांच्या वक्तव्यानी मनसैनिक चिडलेला आहे, असेही जाधव म्हणाले.