“जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:49 PM2024-04-02T12:49:49+5:302024-04-02T12:50:23+5:30

MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला.

mns leader prakash mahajan replied ramdas athawale statement on raj thackeray about likely to join mahayuti | “जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार

“जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार

MNS Vs Ramdas Athawale:महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. राज ठाकरेंना काही प्रस्ताव दिले असून, त्यावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

राज ठाकरे स्वतंत्र लढण्यातच त्यांचा फायदा आहे. त्यांना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असे माझे मत आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले होते. तसेच लोकसभेसाठी आम्हाला दोन जागा मिळाव्यात, यासाठी रामदास आठवले आग्रही होते. परंतु, रामदास आठवलेंना जागा मिळण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे. यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी रामदास आठवलेंना प्रत्युत्तर दिले.

जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील

मूळात राज ठाकरे यांना त्या विषयात का घेतले, हे माहिती नाही. रामदास आठवले हे शीघ्र कवी आहेत. रामदास आठवले यांच्याकडून प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत. या चार ओळी मी प्रथमच लिहिल्या आहेत. त्या रामदास आठवले यांना समर्पित करतो, असे सांगत, “अहो, आठवले साहेब, आपण बसलात भाजपाच्या ओसरीवर आणि राज साहेबांना घरात घ्यायचे नाही, हा सल्ला देता वरचेवर”, असा उपहासात्मक टोला प्रकाश महाजन यांनी रामदास आठवले यांना लगावला. 

राज ठाकरे कडवट हिंदुत्ववादी, धगधगता निखारा

रामदास आठवले यांना एकही जागा मिळाली नाही, त्या तणावातून ते राज ठाकरे यांच्याबद्दल बोलले असतील. राज ठाकरे यांना स्वतःचे मत आहे, स्वतःचे वलय आहे, राजकारणात त्यांच्याविषयी आकर्षण आहे. राज ठाकरे कडवट हिंदुत्ववादी आहेत. धर्मावर आले तर ते हिंदूंसाठी आहेत. मराठीवर आले तर मराठी माणसांसाठी आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा धगधगता निखारा पदरात बांधून घेण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे अन्य छोट्या मित्र पक्षांची किंवा मित्र पक्षातील नेत्यांची तुलना राज ठाकरे यांच्याशी होऊ शकत नाही, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीत सहभागी झाल्यास राज ठाकरे यांना एक ते दोन जागांचा प्रस्ताव दिला असून, महायुतीतील एका पक्षाच्या चिन्हावर लढावे, असे सुचवले आहे. मात्र, असा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याचा ठराव राज ठाकरे यांनी फेटाळला असेल, तर ते माझे नेते आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. कोणताही स्वाभिमानी नेता आपले चिन्ह सोडून दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही. राज ठाकरे यांनी हा बाणेदारपणा दाखवला असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे, असे महाजन यांनी नमूद केले.
 

Web Title: mns leader prakash mahajan replied ramdas athawale statement on raj thackeray about likely to join mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.