Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महायुतीत 'मोठ्या भावा'ने केली निराशा; जास्त जागा लढले, बालेकिल्ल्यातही मागे पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:57 IST2024-06-04T12:51:54+5:302024-06-04T12:57:43+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची (BJP) देशभरात पिछेहाट होत असताना महाराष्ट्रामध्येही भाजपा दारुण पराभवाच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १५ जागांवर आघाडी घेतली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महायुतीत 'मोठ्या भावा'ने केली निराशा; जास्त जागा लढले, बालेकिल्ल्यातही मागे पडले
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची देशभरात पिछेहाट होत असताना महाराष्ट्रामध्येही भाजपा दारुण पराभवाच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १५ जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र यातील अनेक ठिकाणी भाजपाची आघाडी अगदीच नाममात्र असून, या ठिकाणचे निकाल बदलण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने २८ जागा लढवल्या होत्या. मागच्या निवडणुकीत २५ पैकी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपासमोर यावेळी चांगली कामगिरी करण्याचे आव्हान होते. मात्र महाविकास आघाडी आणि विशेषकरून काँग्रेसने दिलेल्या आव्हानामुळे भाजपाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसताना दिसत आहे.
आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भारती पवार हे मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर पडले आहेत. तर जालन्यामधून रावसाहेब दानवे हे पिछाडीवर पडले आहेच. राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार हेसुद्धा चंद्रपूरमधून पिछाडीवर पडले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी २६ आणि महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील पक्षनिहाय आघाडी पाहायची झाल्यास भाजपा १४, शरद पवार गट ७ आणि काँग्रेस १०, शिंदे गट ६ आणि ठाकरे गट प्रत्येकी ९ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.